वीज थकबाकी संदर्भात कठोर पाऊल उचलताना हेस्कॉमने बडगा उगारला असून बेळगाव तालुक्यातील जवळपास 4 कोटी रुपयांचे वीजबिल थकविलेल्या काकती व हिरेबागेवाडी या दोन मोठ्या गावांसह एकूण 14 गावांमधील पथदिव्यांचा वीजपुरवठा तोडला आहे.
हेस्कॉम ग्रामीण उपविभाग -2 या कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार काकती ग्रामपंचायतीकडे तब्बल सुमारे 1 कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील 14 गावांचे मिळून 3 कोटी 80 लाख रुपये वीज बिल थकीत आहे. हेस्कॉम ग्रामीण उपविभाग -2 या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 32 ग्रामपंचायती येतात त्यातील 14 ग्रामपंचायतींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पथदिव्यांची वीज तोडल्यामुळे संबंधित गावांमधील रस्ते बुधवारपासून अंधारात बुडाले आहेत.
वीज पुरवठा तोडलेल्या गावांमध्ये सुळेभावी, मास्तमर्डी, कंग्राळी बुद्रुकचा कांही भाग, निलजी या गावांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतीने तात्काळ वीजबिल भरल्यामुळे मोदगा येथील कारवाई टळली असून मारीहाळ गावची वीज तोडणी आज होण्याची शक्यता आहे. कारवाईचा बडगा उगारल्या नंतर तीन ग्रामपंचायतीने मिळून काल गुरुवारी 17 लाख रुपये वीजबिल हेस्कॉमकडे जमा केले आहे.
थकीत वीज बिल भरण्यासाठी हेस्कॉमने गेल्या 9 जून रोजी 14 गावांना नोटीस बजावली होती. त्यांना वीजबिल भरण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला होता. तो कालावधी 16 जून रोजी संपल्यामुळे हेस्कॉमने कारवाई सुरू केली आहे.
ज्या ग्रामपंचायतींकडे वीजबिल थकीत होती त्यांना रीतसर नोटीस बजावली होती. विज बिल भरण्यासाठी सात दिवसाची मुदत देऊनही ज्यांनी ते भरले नाही तेथील पथदिव्यांचा वीजपुरवठा तोडला आहे, असे हेस्कॉम ग्रामीण उपविभाग -2 चे सहाय्यक लेखाधिकारी मनिष देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.