दोन वर्षांपूर्वी महापुरात घर वाहून गेले… शासनाने नवीन घर मंजूर करत दोन हप्ते देखील दिले. परंतु, तिसर्या हप्त्यासाठी दोन वर्षांपासून हेलपाटे मारूनही अधिकार्यांना पाझर फुटला नाही. शेवटी वैतागलेल्या या गरीब शेतकर्याने कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांची भेट घेऊन कहाणी कथन केली.
आमदारांनी थेट त्याचे गाव गाठले, अधिकार्यांना बोलावून घेत तेथेच फैसला करत त्याची रक्कम मंजूर करून घेतली.
कृष्णा कित्तूर येथील शेतकरी कल्लाप्पा सावगाव यांचे घर 2019-20 च्या महापुरात पडले. याच्या पुनर्रनिर्माणासाठी अधिकार्यांनी सर्व्हे केला, नवीन घर देखील मंजूर केले.
यासाठीचे दोन हप्तेही सावगाव यांना दिले. परंतु, तिसरा हप्ता देण्यास दोन वर्षांपासून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे घराचे काम अर्धवट राहिले होते. दिव्यांग असलेले कल्लाप्पा सावगाव यांनी अनेकदा सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले. परंतु, त्यांची कोणालाही दया आली नाही.
आपली कैफियत घेऊन नुकतीच त्यांनी माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांची भेट घेतली. सर्व कर्मकहाणी सांगितली. त्यांचे सर्व ऐकून घेतल्यानंतर आ. पाटील जाम भडकले. एखाद्या गरीबाला तीन वर्षानंतरही निवारा मिळत नसेल, त्याने काय करायचे? असे म्हणत त्यांनी अधिकार्यांना फोनवरून चांगले फैलावर घेतले. यानंतर ते थेट कृष्णा कित्तूर येथे कल्लाप्पा सावगाव यांच्या घराजवळ पोहोचले. अर्धवट घर पाहून ते आणखीनच भडकले. येथे बोलावून घेतलेल्या अधिकार्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले.
दोन वर्षांपासून याचा तिसरा हप्ता मिळालेला नाही, तुम्ही नेमके करता काय? असा प्रश्न करत आताच्या आता या घराचा जीपीएस करून रक्कम मंजूर करा, अशी सूचना केली. त्यानुसार अधिकार्यांनी जागेवरच जीपीएस करून या घरासाठीचा तिसरा हप्ता मंजूर केल्याचे आमदारांना सांगितले. आपल्या घराचे स्वप्न साकार होत असल्याच्या आनंदाने सदर शेतकर्याने आ. पाटील यांचा सत्कार केला. त्याचयकडून सत्कार स्विकारताना पुन्हा काही अडचण आल्यास मला थेट येऊन भेटा, असे कल्लाप्पा यांना सांगितले.
घराचे काम अपूर्ण राहिल्याने मी अनेकदा तलाठी, तहसीलदारसह संबंधित संबंधित अधिकार्यांना भेटलो. परंतु, आपल्या अर्जाची व विनंतीची कोणीच दखल घेत नव्हते. त्यामुळे एकदाच आमदारांना भेटलो व त्यांनी ही बाब मनावर घेत आपल्या घरापर्यंत आले. सर्वसामान्यांप्रती त्यांच्या मनात असलेला जिव्हाळा पाहून मी खरंच भारावून गेलो असे कल्लाप्पा सावगाव लाभार्थी शेतकरी यांनी म्हटलं आहे.