हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला बेळगावच्या 8 व्या अतिरिक्त दिवाणी न्यायालयाने दाव्याचा निकाल लागेपर्यंत जो मनाई अर्थात स्थगिती आदेश दिला आहे, तो आदेश जोपर्यंत मागे घेतला जात नाही अथवा त्यात कांही बदल होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात पाय टाकू नये, तसेच बायपासचे बांधकाम तात्काळ पूर्णपणे बंद करावे, असा आदेश आज उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पुन्हा चपराक बसली आहे.
न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू मांडणारे वकील ॲड. रवीकुमार गोकाककर यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना न्यायालयाच्या उपरोक्त आदेशाची माहिती दिली. ॲड. गोकाककर म्हणाले की, हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या खटल्याची आज मंगळवारी उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली.
मागील तारखेला गैरहजर असणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वकीलही यावेळी हजर होते. या सुनावणीप्रसंगी बेळगावच्या 8 व्या अतिरिक्त दिवाणी न्यायालयाने हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला दिलेल्या मनाई आदेशाची प्रत आपण न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली सदर मनाई आदेश हा दावा निकाली होईपर्यंत आहे. मात्र असे असतानाही न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीचा गैरफायदा घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन देखील कोणतीच कार्यवाही झाली नाही. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था पाळणे दूरच उलट त्यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मदत करण्याचे काम सुरू आहे.
ही बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलाने देखील खालच्या कोर्टाचा बायपासच्या कामाला मनाई हुकूम असल्याचे मान्य केले. त्यामुळे खालच्या कोर्टाने दाव्याचा निकाल होईपर्यंत बायपासच्या कामाला जो मनाई हुकूम अर्थात स्थगिती आदेश दिला आहे.
तो आदेश जोपर्यंत मागे घेतला जात नाही, त्यात काही बदल होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात पाय देखील टाकू नये. तसेच सध्या सुरू असलेले बायपासचे काम तात्काळ पूर्णपणे बंद करण्यात यावे असा आदेश उच्च न्यायालयाने बजावला आहे, अशी माहिती ॲड. रवीकुमार गोकाककर यांनी दिली. हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामाचा स्थगिती आदेश पुन्हा एकदा कायम झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.