गौंडवाड (ता. जि. बेळगाव) येथील सतीश राजेंद्र पाटील (वय 37) या युवकाच्या खुनाबरोबरच संतप्त जमावाने दगडफेक व जाळपोळ करण्याची जी घटना घडली त्याला पोलिसांचे दुर्लक्षच जबाबदार असल्याचा आरोप यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी केला आहे.
यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी काल बुधवारी गौंडवाडला भेट देऊन खून झालेल्या युवकाच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी मयत सतीश यांच्या आईने आपल्या निष्पाप मुलाचा खून करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
पोलीस निरपराध लोकांची धरपकड करीत आहेत असे सांगून काकती पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. यावेळी गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार सतीश जारकीहोळी यांनी पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचा आरोप केला.
काकती पोलीस स्थानकात वर्षानुवर्षे मुक्काम ठोकून असलेल्या पोलिसांमुळे लोकांना न्याय मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधी आपण पोलिस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचेही आमदार जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी आमदारांसह वेळेत अरुण कटांबळे, मलगौडा पाटील, एम. जी. प्रदीप आदी उपस्थित होते.
दरम्यान, गौंडवाड घटनेप्रकरणी काकती पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. गंगाराम यल्लाप्पा पाटील व नंदू यल्लाप्पा पाटील (दोघेही रा. गौंडवाड) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. घटनेच्या दुसऱ्या दिवशी याप्रकरणी 19 जणांना अटक करण्यात आली होती. बुधवारी आणखी दोघांना अटक झाली आहे. काकतीचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ व उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे