शारीरिक, मानसिक आणि भावनिक अत्याचार झालेल्या जगभरातील मुलांच्या वेदनांचा आदर करण्यासाठी 4 जून हा दिवस गांभीर्याने पाळला जातो. त्या अनुषंगाने जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) या संघटनेतर्फे गोल्याळी (ता. खानापूर, जि. बेळगाव) गावात विशेष उपक्रम राबविण्यात आला.
सदर उपक्रमांतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेंन)चे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, संचालक पद्मप्रसाद हुली, एनजीओ राहुल पाटील व एसडीएमसीचे अध्यक्षानी नुकतीच बेळगावपासून सुमारे 35 कि. मी. वरील खानापूर तालुक्यातील गोल्याळी गावाला दिली. गोल्याळी हे गाव जंगल प्रदेशात आहे. परिणामी या गावातील कणकुंबी, खानापूर, बेळगाव आदी ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो.
त्यांच्या हितासंदर्भात जायन्ट्सचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुलांची व ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांच्यात जागृती निर्माण करण्याद्वारे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास दिला. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांना गोल्याळी भागातील शालेय मुलांचे शिक्षण सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.
सदर जनजागृती बरोबरच 6 जून जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून गावातील जायन्ट्सच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक शाळेला भेट दिली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यायाने पर्यावरणाचे महत्त्व विशद केले त्याचप्रमाणे विद्यार्थी-विद्यार्थिनींना वृक्षारोपणासाठी झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगावचे (मेन) अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक रोपटे देऊन आपल्या घरासमोर लावण्यास सांगितले. याप्रसंगी जायन्ट्स संचालक पद्मप्रसाद हुली, राहुल पाटील, एसडीएमसीचे अध्यक्ष आदींसह विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.