उद्या स्वातंत्र्यदिन प्रजासत्ताक दिन किंवा गांधी जयंती नाही पण तरीही सांबरा येथील प्राथमिक मराठी शाळेला विद्युत रोषणाई आणि कंपाऊंडला रंग रंगोटी करून सजवण्यात आले आहे.
तब्बल 25 वर्षांनी 1996-97 साली सातवी उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी रौप्यमहोत्सवी एकत्र येत आहेत त्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.अनेक शाळांतील माजी विध्यार्थ्यां प्रमाणे हे देखील एकत्र येऊन गेट टूगेदर करत आहेत.
शनिवारी हे सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी 25 वर्षांनी आपल्या शाळेत एकमेकांना भेटणार असून बालपणीच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. यानिमित्ताने गुरुजनांचा सत्कार आणि शाळेच्या मुलांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून मोठे एक्वागार्ड भेट देणार आहेत.
माजी विद्यार्थीनींचे विवाह झाले असून त्या शाळेच्या स्नेह मेळाव्यासाठी आपल्या माहेरी दाखल झाल्या आहेत त्या सगळ्या मैत्रिणी एकच रंगांची साडी परिधान करून कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
सैन्य दलात सेवा बजावणाऱ्या काहींनी या कार्यक्रमासाठी खास सुट्टी मंजूर करून घेतली आहे त्यामुळे आपल्या शाळेविषयी आस्था दाखवणाऱ्या या माजी विध्यार्थ्यांचा स्नेह मेळावा सांबरा गावासाठी लक्षवेधी आणि आदर्शवत ठरणार यात शंका नाही.