कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्यासाठी येत्या 27 जून रोजी काढण्यात येणारा मोर्चा ‘एक सीमावासीय लाख सीमावासीय’ या घोषवाक्य प्रमाणेच ‘विराट’ असला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी आत्तापासूनच तयारीला लागले पाहिजे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले.
शहरातील मराठा मंदिर येथे आज दुपारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये किणेकर बोलत होते. ‘एकच सीमावासीय लाख सीमावासीय’ हे घोषवाक्य फक्त घोषवाक्य न राहता 27 जून रोजीचा मोर्चा प्रसंगी त्याची अंमलबजावणी रस्त्यावर झाल्याचे सरकारला दिसून यायला हवे तेव्हा त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला हवे त्यासाठी बेळगाव शहर तालुक्यासह खानापूर तालुका, निपाणी विभाग आधी आपापल्या विभागात सर्वांनी जनजागृतीचे कार्य हाती घ्यावे असे सूचित करून मोर्चाच्या दिवसापर्यंत म्हणजे येत्या 20 -22 दिवसात सातत्याने ही जनजागृती मोहीम राबविल्यास मोर्चा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, असा विश्वास माजी आमदार किणेकर यांनी व्यक्त केला.
हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक सुशोभीकरण तसेच हुतात्मा स्मारक भवन उभारणीच्या कार्यासंदर्भातही त्यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. निधी गोळा करण्याच्या अनुषंगाने आपले विचार व्यक्त करताना त्यांनी सीमा भागात विशेष करून बेळगाव व खानापूर तालुक्यात मराठी भाषिकांच्या असंख्य सहकारी सोसायटी आहे
त्यांच्याकडून मदत घेण्याचा सल्ला दिला. गेल्या 1 जुन 1986 रोजी हुतात्मा झालेल्या ना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हिंडलगा हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी नुकताच पार पडला. त्याप्रमाणे 6 जून 1986 रोजी बेळगुंदी येथे गोळीबारात हुतात्मा झालेल्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम दरवर्षी बेळगुंदी येथे आयोजित केला जातो. बेळगाव तालुक्यातील समितीमध्ये आता एकजूट झाली आहे.
तेंव्हा बेळगुंदी येथे येत्या सोमवारी 6 जून रोजी होणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमास देखील सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हजर रहावे, असे आवाहनही कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले.