अग्नीपथ योजनेच्या निषेधार्थ बेळगावात उद्या पुकारण्यात येणाऱ्या बंदला कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. परवानगी नसताना निदर्शने आणि आंदोलने केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिला आहे.
केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात देशभरात सातत्याने आंदोलनाचा छेडली जात आहेत. बेळगाव जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी युवावर्गाने आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला आहे. आता खुद्द बेळगाव शहरात उद्या अग्निपथच्या विरोधात बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोर्चाही काढला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातील आपल्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी उपरोक्त इशारा दिला आहे.
उद्याच्या बेळगाव बंदला कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे आंदोलन छेडून कोणत्याही प्रकारचे अहितकारक कृत्य करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यास पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जाणार आहे. बंद पुकारून मोर्चा अथवा आंदोलनं करण्याचा प्रकार घडल्यास ड्रोन कॅमेराद्वारे आंदोलकांना टिपून कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे सध्या शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सामाजिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात युवावर्गाने उद्या सोमवारी बेळगावमध्ये बंदची हाक देण्याबरोबरच तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार केला असल्यामुळे पोलीस प्रशासन परिस्थिती कशी हाताळणार? याचे उत्तर उद्या मिळणार आहे.