अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून व फोनवरून बोलत असल्याचे पाहून पत्नी व तरुणाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पतीसह तिघा तरुणांना फाशीची शिक्षा चिकोडी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
2013 साली झालेल्या दुहेरी खून प्रकरणी चिकोडी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस एल चव्हाण यांनी तिन्ही आरोपीना फाशीची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारी वकील वाय. जी. तुंगळ यांनी काम पाहिले.
आरोपी पती बाबू मूतप्पा अकळे (वय 33) , नागप्पा मुतप्पा अकळे (वय 30), मूतप्पा भीमप्पा अकळे (29 ) सर्व रा. ममदापुर के.के. ता.चिकोडी असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी की चिकोडी तालुका व चिकोडी पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या ममदापुर के.के. या गावात मयत पत्नी संगीता बाबू अकळे ( वय 20) घराच्या शेजारी असलेल्या बसवराज प्रभाकर बुर्जी (त्यावेळी वय 24) या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पती बाबू याला होता.
दोघेजण फोनवरून बोलत असल्याचे ऐकून पती बाबू याने रागाने वरील आरोपीसह दि 22 – 10- 2013 रोजी रात्री 10.30 वाजता मयत बसवराज याच्या घरी जाऊन अवाच्य शब्दाने शिवीगाळ करून, ओढत नेऊन घराच्या मागे असलेल्या बाभूळच्या झाडाला दोरीने बांधले. त्यानंतर घरात असलेल्या पत्नीला देखील ओढत आणून त्याच झाडाला बांधून कोयत्याने मयत बसवराज व संगीता यांचा निर्घृण खून केला होता.
यावेळी भांडण सोडविण्यास गेलेल्या फिर्यादी शिवानंद बुर्जी यांच्यावर हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला होता.
त्यावेळी या प्रकरणी चिकोडी पोलीस स्थानकात चार जण आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तत्कालीन चिकोडीचे सिपीआय शंकर रागी यांनी तपास करून आरोप पत्र दाखल केले होते.
त्यानंतर तब्बल 9 वर्षानंतर खटला चालू होता. आज याप्रकरणी चिकोडी जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
सायंकाळी सर्व आरोपींना चिकोडी न्यायलयातून बेळगांव हिंडलगा कारागृहात बंदोबस्तत वाहनाने नेण्यात आले.
याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती.
यावेळी मयत बसवराज यांची आई अरुणा बुर्जी बोलताना आपला मुलगा परत येणार नाही पण, आरोपींना शिक्षा झाल्याचे समाधान वाटत असल्याचे डोळ्यातुन अश्रू काढून सांगितल्या.
20 वर्षानंतर पहिलीच फाशीची शीक्षा – बेळगाव जिल्ह्यात मागील वीस वर्षांनंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याची पहिले प्रकरण आहे. तसेच चिकोडी येथे 2013 साली अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय झाल्यापासून फाशीची शिक्षा सूनावल्याचे पहिलेच प्रकरण आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीला मोठे महत्व आहे.