बेळगावच्या कमांडो विंगमध्ये सेवा बजावणारे सुभेदार मेजर गेल्या शनिवारी सायंकाळपासून अचानक गुढरित्या बेपत्ता झाले आहेत. लष्करी अधिकाऱ्यांनी यासंबंधी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सुरजितसिंग एच. (वय 47, मूळ रा. कुडवईनवाली पो. दोरगंला ता. दिननगर जि. गुरदासपुर पंजाब, सध्या रा. कमांडो विंग कॅम्प) असे त्यांचे नांव आहे. सुभेदार दयानंद भोगण (रा. कमांडो विंग कॅम्प) यांनी सुरजित सिंग बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. सुभेदार मेजर सुरजित सिंग फिर्यादी भोगण यांच्यासमवेत कमांडो विंगमध्ये जवानांना प्रशिक्षण देत होते.
गेल्या शनिवारी सायंकाळी सायकलवरून ते आपल्या मोबाइल दुरुस्त करण्यासाठी शहरात आले होते. शहरातील संभाजी चौक येथील वैशाली रेस्टॉरंट अँड बार येथे ते शेवटचे आढळून आले, त्यानंतर ते अचानक गुढरित्या बेपत्ता झाले आहेत. पोलिसात त्यासंबंधी तक्रार दाखल होताच गेले दोन दिवस पोलीस सुरजित सिंग यांचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप त्यांचा पत्ता लागू शकलेला नाही.
पोलिसांत खेरीज रविवारी सकाळपासून कमांडो अधिकारी व जवानांनी त्यांना शोधण्यासाठी दिवसभर शहर परिसर पिंजून काढला. सुभेदार मेजर सुरजित सिंग एच. जेथून बेपत्ता झाले तेथील सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये सुरजित सिंग सायकल वरून येऊन सायकल स्टॅंडवर लावताना आढळून आले आहेत. त्या भागात चौकशी करून शोध घेण्याबरोबरच त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचे लोकेशन कॅम्प येथे दाखवत आहे. तरी छायाचित्रात दिसणाऱ्या व्यक्तीबद्दल कोणाला माहिती असल्यास अथवा ही व्यक्ती आढळून आल्यास त्यांनी कॅम्प पोलिसांची अथवा कमांडो विंगशी (मो. क्र. 9899217518) संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना कमांडो विंगचे कमांडर कर्नल मनोज शर्मा यांनी शनिवारी सायंकाळी 7:45 वाजता आमच्या कमांडो विंग असे सुभेदार मेजर सुरजित सिंग शहरातून बेपत्ता झाले आहेत. आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सीसीटीव्ही फुटेज वरून वैशाली रेस्टॉरंट अँड बार समोर आपली सायकल पार केल्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. नव्याने खरेदी केलेला आपला मोबाईल दुरुस्त करण्यासाठी ते शहरात आले होते.
त्यांची सायकल आम्हाला सापडली आहे. मात्र ते बेपत्ता असून यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह कमांडो विंग चिंतेत आहे. तरी सर्वांना अपील आहे की सुभेदार मेजर सुरजित सिंग यांच्या बद्दल कोणाला माहिती असल्यास अथवा ते कोणाला आढळून आल्यास त्यांनी कृपया तात्काळ पोलिसांची अथवा कमांडो विंगशी संपर्क साधावा, असे असे आवाहन मनोज शर्मा यांनी केले.