भाजपने काल राज्यसभेच्या तीन जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. आता येत्या 13 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील भाजप सर्व चार जागा जिंकेल, असा विश्वास जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी व्यक्त केला.
बेळगावमध्ये आज शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदार अत्यंत उत्साहाने भाजपला संपूर्ण पाठिंबा देत आहेत. देशभरात भाजपची सत्ता असावी अशी देशातील बुद्धीजीवी लोकांची अपेक्षा आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री बोम्मई यांच्या प्रशासनाला अतिशय प्रेमाने आणि विश्वासाने जनता पाठिंबा देत आहे. विधान परिषदेच्या चार पैकी चार जागा आम्ही जिंकू. हनुमंत निराणी आणि अरुण शहापूर प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मंत्री कारजोळ यांनी व्यक्त केला.
अरुण शहापूर यांनी काय काम केले? या काँग्रेसचे आमदार आयवन डिसोजा यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री कारजोळ म्हणाले की अरुण शहापूर यांनी काय काम केले ते जनतेला माहित आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी काय काम केले हे सुद्धा जनतेला ठाऊक आहे. राज्यात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि विद्यमान मुख्यमंत्री बोम्मई यांनी काय काम केलं हे सुद्धा सगळ्यांना माहित आहे. हताश होऊन काँग्रेस नेते अशा प्रकारे वक्तव्य करत आहेत. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. एकंदर राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील सर्व जागा जिंकत भाजप दणदणीत विजय संपादन करेल असा विश्वास जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी शेवटी पुन्हा एकदा व्यक्त केला.
चारही जागा जिंकण्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास
राज्यभरातील वाढता प्रतिसाद आणि पाठिंबा लक्षात घेता विधान परिषदेच्या सर्व चारही जागा आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सांगितले.
हुबळी विमानतळावर मुख्यमंत्री बोम्मई पत्रकारांशी बोलत होते. मी सध्या बेळगाव आणि हुबळी मधील प्रचार दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान आत्तापर्यंत जनतेकडून मिळत असलेला वाढता पाठिंबा लक्षात घेता मला खात्री आहे की भाजप सर्व चारही जागांवर विजयी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.