विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त असलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज शनिवारी अचानक भाजपचे माजी राज्यसभा सदस्य डॉ प्रभाकर कोरे यांची त्यांच्या बेळगाव येथील निवासस्थानी धाव घेऊन निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी महत्त्वाची चर्चा केली.
हुबळी येथून थेट बेळगावात दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांनी आज शनिवारी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या कॅम्प येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. डॉ. प्रभाकर कोरे हे लिंगायत समाजाचे नव्हे तर संपूर्ण उत्तर कर्नाटकातील प्रभावी नेते मानले जातात.
त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसण्याचा धोका लक्षात घेऊन विधान परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवारांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना विनवणी करून डॉ. कोरे यांची भेट घेण्यास सांगितल्याची चर्चा आहे. यासाठीच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भेटीसाठी आज बेळगावात धाव घेतल्याचे समजते.
बेळगाव, बागलकोट आणि विजयपूरा या ठिकाणी एकट्या केएलईच्या शैक्षणिक संस्थांमध्ये 3 हजारांहून अधिक मतदार असून ते भाजपच्या विजयात महत्वाची भूमिका बजावू शकतात.
यासाठी डॉ. कोरे यांना डावलून चालणार नाही हे लक्षात येताच स्वतः मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या भेटीसाठी आज थेट त्यांचे घर गाठून निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी महत्त्वाची चर्चा केली.