बेळगावातील स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामामुळे मनुष्य प्राण्यांना तर फटका बसतच आहे, मात्र आता जनावरांनाही त्याची झळ बसू लागली आहे.
रस्त्याशेजारी गटारीवरील बांधकाम अर्धवट ठेवल्यामुळे चक्क एक म्हैस गटारात अडकून पडल्याची घटना आज सकाळी घडली.
शहरातील क्लब रोडवर ये -जा करणाऱ्या नागरिकांना आज बुधवारी सकाळी रस्त्याशेजारील गटारीमध्ये एक म्हैस अडकून पडल्याचे निदर्शनास आले. क्लब रोडवरील एका बाजूच्या गटारीवर स्लॅब घालताना एके ठिकाणी गटार खुली ठेवली असल्यामुळे हा प्रकार घडला.
गटारीत एक म्हैस विचित्रपणे असाहाय्य अवस्थेत अडकून पडल्याचे निदर्शनास येताच कांही जागरूक नागरिकांनी लागलीच महापालिका व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिली.
अखेर सकाळपासून गटारीत अडकून पडलेल्या त्या म्हशीला दुपारी 12 च्या सुमारास गटारीतून बाहेर करण्यात आले. म्हशीला सहजासहजी बाहेर काढणे शक्य नसल्याने जेसीबीचा वापर करावा लागला. हे मदत कार्य सुरू असताना बघ्यांची एकच गर्दी झाली होती.