भविष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाऊन सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन पुढे जायला हवे. सर्व संकटांना मात करून सर्वांच्या हिताकरिता माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येणे गरजेचे असून नवा सुदृढ समाजाचे, चांगल्या पद्धतीचे विचार नव्या पिढीत रुजविणे काळाची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यायला हवे, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत आर. वाय. पाटील यांनी केले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने माजी विद्यार्थ्यांच्या कार्यकारणीची बैठक आज बुधवारी महाविद्यालयाच्या जिमखाना कै. मारुतीराव काकतकर सभागृहात बैठक घेण्यात आली. याप्रसंगी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून आर. वाय. पाटील बोलत होते.
माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे; यापुढेही अशा वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम यशस्वी करण्याकरिता प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा , पुढे यायला हवे आणि सर्वांच्या कल्याणाकरिता पुढे वाटचाल करायला हवी, असेही पाटील म्हणाले.
याप्रसंगी व्यासपीठावर भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, प्राचार्य डॉ. आर. डी. शेलार, माजी विद्यार्थी संघटना समन्वयक प्रा. डॉ. एम. व्ही. शिंदे , प्रा. नितीन घोरपडे, प्रा. एन. एन. शिंदे, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. बी.आय. वसुलकर, चार्टर्ड अकाउंटंट सुरेश बरगावकर उपस्थित होते.
यावेळी बी. के. कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला. बैठकीस माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.