बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) गावामध्ये असलेल्या परिशिष्ट जातीच्या लोकांच्या जमिनीतील पिकाचे कांही लोकांकडून नुकसान केले जात आहे. हा प्रकार थांबून परिशिष्ट जातीच्या लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी दलित संघर्ष समिती भीमवाद संघटनेने बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख आणि बेळगाव पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावाच्या सर्व्हे नं. 300/285 मध्ये आम्हा दलित समाजाच्या लोकांची 25 एकर जमीन आहे. ही जमीन आम्ही पूर्वापार कसत आलो आहोत. मात्र अलीकडे अन्य समाजाचे लोक आमच्या जमिनीत घुसून पिकांचे नुकसान करत आहेत.
यासंदर्भात आम्ही यापूर्वी बेळगाव जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन सादर करून देखील अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. तेंव्हा आता जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आणि पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगुंदी येथील एक दलित ग्रामस्थ म्हणाला की, आमच्या वाडवडिलांच्या काळापासून बेळगुंदी येथील आर. एस. नं. 300 व 258 मधील 25 एकर जमिनीमध्ये आम्ही शेती करत आलो आहोत. मात्र अलीकडे मराठा समाजाचे काही लोक आमच्या जमिनीत घुसून पिकांचे नुकसान करत आहे.
या संदर्भात केलेल्या तक्रारीकडे जिल्हाधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज आम्ही जिल्हा पोलिस प्रमुख आणि पोलिस आयुक्तांकडे न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहोत असे सांगितले पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी रवी बस्तवाडकर संतोष कांबळे दुर्गप्पा चलवादी रामू कांबळे विनायक कोलकार परशुराम कांबळे निंगाप्पा कांबळे आदींसह बेळगुंदी गावातील दलित बांधव आणि दलित संघर्ष समिती भीमवाद संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.