आर्यन इंटरटेनमेंटस प्रस्तुत ‘थोडी ओली पाने’ या बेळगावचे अनिरुद्ध ठुसे लेखक व दिग्दर्शक असलेल्या लघु चित्रपटाला सत्यजित रित्विक मृणाल आंतरराष्ट्रीय कलकत्ता चित्रपट महोत्सवासाठी निवड झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
‘थोडी ओली पाने’ या लघुचित्रपटाला यंदा दक्षिण भारत लघु चित्रपट महोत्सव तसेच रॉयल पिकॉक चित्रपट महोत्सव या दोन महोत्सवांमध्ये अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. हा लघु चित्रपट गेल्याच महीन्यात बेळगावातच्या चित्रलोक मुव्ही क्लब येथेही दाखवली गेला.
अनिरुद्ध ठुसे यांना या अगोदर रंगकर्मीं प्रतिष्ठान लातूर -उदगीर (महाराष्ट्र) तर्फे नाटक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘कला’ पुरस्कार जाहीर झाला होता.
ठुसे यांनी पुणे येथे 35 वर्षे रंगभूमीची सेवा केली आहे. बेळगाव येथे त्यांनी प्रायोगिक रंगभूमी वर 40 हून अधिक नाटके, एकांकिका, दीर्घांक यामध्ये अभिनय लेखन व दिग्दर्शन केले आहे. अनिरुद्ध यांनी भारतातील सर्वश्रेष्ठ नाट्यदिग्दर्शक व रंगकर्मी पंडित सत्यदेव दुबे यांच्याकडे 3 वर्षे अभिनय कार्यशाळेत अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी अभिनय केलेल्या कांही महत्त्वाच्या नाटकांमध्ये पंडित सत्यदेव दुबे दिग्दर्शित ‘आयुष्यात पहिल्यांदाच’, संदेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘कोवळी उन्हे’, अतुल पेठे दिग्दर्शित ‘सूर्य पाहिलेला माणूस’ आणि ‘उजळल्या दिशा’, सुबोध भावे दिग्दर्शित ‘सफर’ तसेच प्रसाद वनारसे दिग्दर्शित ‘न भयं न लज्जा’ या नाटकांचा समावेश आहे.
रेषा (महाराष्ट्र साहित्य परिषद लेखनाचे प्रथम पारितोषिक), मिशन हाणामारी, कॉर्पोरेट कुटुंब, गुरु पाचपांडे, पंख आणि मी टू व तु मी हे अनिरुद्ध ठुसे यांनी स्वतः लिहिलेले व सादर केलेले नाट्यप्रयोग आहेत. या खेरीज रॉय किणीकर यांच्या कवितांवर आधारित ‘घरटे शोधणारे पीस’ कार्यक्रम, कवी साहिर यांच्या चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम, कामगार बंधूंच्या जीवनावर आधारित कवितांचे अभिवाचन आणि कवी बा. भ. बोरकरांची कविता या कार्यक्रमाचे दिग्दर्शन व सादरीकरण ठुसे यांनी केले आहे.
बेळगाव येथील लोकमान्य ग्रंथालय बुक लव्हर्स क्लबमध्ये अनिरुद्ध ठुसे यांचे पुस्तक परिचय व साहित्य आधारित कार्यक्रम सादर झाले आहेत. त्यामध्ये आनंद ओवरी -दि. बा. मोकाशी, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य -नरहर कुरुंदकर, पुलंचा अंतू बर्वा, गडकरी यांचे नाटक भावबंधन आणि नाटकातील साहित्यिक मुल्य व साहित्यातील नाटक यांचा समावेश आहे.
आकाशवाणी पुणे केंद्र व वेणू ध्वनी बेळगाव येथे नभोनाट्य सादर करणारे ठुसे हे बेळगावात गेली 3 वर्षे ‘शब्द’ या एकपात्री स्पर्धेचे आयोजन करत आहेत. आचरेकर प्रतिष्ठान आयोजित बालनाट्य स्पर्धा (2004, कणकवली), पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा (2009, पुणे), सकाळ करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा (2011, जळगाव), जनक्रांती करंडक एकांकिका स्पर्धा (2011, पुणे) आणि सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा (2012, गोवा) या स्पर्धांसाठी अनिरुद्ध ठुसे यांनी नाट्यपरीक्षक म्हणून काम पाहिले आहे.