केंद्र सरकारने येत्या 1 जुलैपासून देशात एकेरी वापराच्या म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. पर्यावरण मंत्रालयाने यासंदर्भात काल मंगळवारी अधिसूचना जारी केली आहे.
पर्यावरण मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार 1 जुलै 2022 पासून एकेरी वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर या सर्वांवर बंदी असेल. यात पॉलिस्टीरिन आणि विस्तारित पॉलिस्टीरिन वस्तू देखील समाविष्ट आहेत.
बंदी असलेल्या वस्तूंमध्ये फुगे, इअर बड, आईस्क्रीम, कँडीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या काड्यांचाही समावेश आहे. याशिवाय प्लॅस्टिक कप, ग्लास, चमचे, काटे, चाकू, स्ट्रॉ आणि 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक किंवा पीव्हीसीपासून बनवलेले बॅनर यावरही बंदी घालण्यात येणार आहे.
कायद्यानुसार 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरी बॅगवर बंदी घालण्याची तरतूद आहे. पर्यावरण मंत्रालयाने यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. त्यानुसार एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केले जातील.
त्याच प्रमाणे विशेष अंमलबजावणी पथके तयार केली जातील, जी बंदी घातलेल्या प्लास्टिक वस्तूंचे बेकायदेशीर उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर यावर लक्ष ठेवतील.
या खेरीज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्या सीमेवर चौक्या उभारण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून या गोष्टींच्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणार्या वाहतुकीला आळा घातला जाणार आहे.