अग्नीपथ योजनेच्या विरोधात आंदोलनं, निदर्शनं होण्याची शक्यता असल्याने बेळगाव शहरातील रेल्वे स्टेशन, कॅन्टोन्मेंट परिसर, मराठा सेंटर आणि किल्ला या महत्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहे याप्रमाणे आज बेळगावमध्ये देखील बंद पुकारून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र अग्निपथच्या विरोधात कोणतेही आंदोलन होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे.
यासाठी शहरात सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष करून बेळगाव रेल्वे स्टेशन, कॅन्टोन्मेंट परिसर मराठा सेंटर आणि किल्ला या महत्वाच्या ठिकाणी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकावर कांही ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
दरम्यान, काल रविवारी सायंकाळी पोलिसांनी शहरात पथसंचलन केले होते. या पथसंचलनात जलद कृती दलाच्या जवानांचाही सहभाग होता. एकंदर आजच्या सोमवारच्या दिवशी शहरात जिकडे पाहावे तिकडे पोलिस दिसत असल्यामुळे आजचा दिवस जणू पोलिस बंदोबस्तासाठी असल्याचे जाणवत होते राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल हे शहरातील आंदोलन करण्याचे प्रमुख स्थळ आहे.
त्यामुळे चन्नम्मा सर्कल येथे देखील मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या चौकासह शहरात ठिकाणी पोलीस व्हॅन तसेच अन्य पोलिस वाहने मोठ्या प्रमाणात थांबलेली पहावयास मिळत होती. एकूणच पोलिस प्रशासनाने अग्निपथच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली आहे.
दरम्यान किल्ला आणि कॅम्प परिसरात मिलिटरी भरतीसाठी येणाऱ्या युवकांचे पोलीस कसून चौकशी देखील करत आहेत आणि आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याने या युवकांना माघारी पाठवत आहेत.