राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलाने प्रभावी उपाययोजना राबविल्या आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये समाजात शांतता अबाधित राखण्यासाठी नागरिक आणि माध्यमांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे विचार राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) अलोककुमार यांनी व्यक्त केले.
बेळगाव पोलीस दलातर्फे आज शनिवारी सकाळी एडीजीपी अलोककुमार यांचे शानदार मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
समारंभास पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
एडीजीपी अलोक कुमार यांचे समारंभ स्थळी आगमन होताच प्रारंभी त्यांना पोलीस दलाच्या पथकांनी शानदार पथसंचलनाद्वारे मानवंदना दिल्यानंतर मुख्य समारंभाला सुरुवात झाली. यावेळी एडीजीपी यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
सदर समारंभपूर्वी एडीजीपी अलोककुमार यांनी काल शुक्रवारी सायंकाळी शहरातील मार्केट आणि खडेबाजार पोलीस ठाण्याला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. त्याचप्रमाणे तेथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना तंदुरुस्त आरोग्यासह कर्तव्याची जाणीव करून दिली. याप्रसंगी पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.