गोकाक रोड कणबर्गी येथे हिडकल जलवाहिनीला लागलेल्या गळतीसंदर्भात ‘एल अँड टी’ याकडे केव्हा लक्ष देणार? या शीर्षकाखाली बेळगाव लाईव्हने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत तुर्तास गळती लागलेल्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला गोकाक रोड, कणबर्गी येथील तिसऱ्या बस स्टॉपनजीक गळती लागली आहे. गेल्या दोन -तीन महिन्यापासून जलवाहिनीतून पाण्याची गळती होत असल्यामुळे लाखो गॅलन पाणी वाया जात आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या पद्धतीने पाण्याचा अपव्यय होण्याबरोबरच आसपासच्या शेत पिकांचे देखील नुकसान होत आहे. यासंदर्भात बेळगाव लाईव्हने आज मंगळवारी सकाळी वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठविला होता.
सदर वृत्ताची दखल घेऊन एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारनंतर जलवाहिनीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे दुरुस्तीचे काम मोठे असल्यामुळे सध्या जे पाणी आसपासचा परिसर व शेतवाडीत साचत आहे ते साचू नये यासाठी तूर्तास पाईप घालून त्याद्वारे पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केली आहे.
तथापि हा तात्पुरता उपाय असल्यामुळे लवकरात लवकर जलवाहिनीची व्यवस्थित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी गोकाक रोड, कणबर्गी येथील तिसरा बस स्टॉपनजीक शेती असलेल्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.