आगामी 2023 सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपले 18 उमेदवार उतरणार आहे असे स्पष्ट करण्याबरोबरच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बेळगाव दौऱ्यावर येत असून त्यांचे राणी चन्नम्मा सर्कल येथे भव्य स्वागत करून सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) राज्याध्यक्ष आर. हरी यांनी दिली.
शहरातील सर्किट हाऊस येथे आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या बुधवारी बेळगाव दौऱ्यावर येत असून या निमित्ताने चन्नम्मा सर्कल येथे त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे आगामी 2023 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 18 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असून निवडणुकीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे आर. हरी यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा जो आरोप केला जात आहे, त्यासंदर्भात बोलताना एनसीपी राज्याध्यक्ष आर. हरि यानी राज्यात सरकारचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असून त्याच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेस अमोल देसाई, के. जी. पाटील, नारायण बसर्गी, दुर्गेश मेत्री, आप्पासाहेब नायक, सुरेंद्र आदींसह राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.