या महिन्यात एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल लागणार आहे. निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ही आहे की यंदा दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना 10 टक्के ग्रेस मार्क दिले जाणार आहेत. कर्नाटक राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
यंदाचा दहावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचे परीक्षा मंडळाने निश्चित केले आहे. शिक्षण मंत्र्यांनी देखील त्याबाबत सूतोवाच केला आहे. खरेतर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा निकाल जाहीर होणार होता, परंतु तो लांबणीवर टाकण्यात आला यंदाचा दहावीचा निकाल 19 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी पूर्वी 5 टक्के ग्रेस मार्क दिले जात होते. मात्र कोरोना काळात परीक्षा मंडळाने 10 टक्के ग्रेस मार्क देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 2021 साली दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे.
गेल्या 2020 साली कोरोना सुरू झाला. मात्र त्याचा अडथळा शैक्षणिक वर्षाला झाला झाला नसला तरी त्यानंतर 2021 -22 या शैक्षणिक वर्षात कोरोनाचा अडथळा कांही प्रमाणात निर्माण झाल्यामुळे 2022 मध्ये विद्यार्थ्यांना 10 टक्के ग्रेस मार्क द्यावेत अशी मागणी वाढली. शिक्षक व पालकांकडून ही मागणी पुढे आली. त्यामुळे 10 टक्के ग्रेस मार्क देण्याचा निर्णय झाला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेत एखाद्या विषयात 25 पेक्षा जास्त किंवा 30 पेक्षा कमी गुण मिळतात त्या विद्यार्थ्यांसाठी हे ग्रेस मार्क महत्त्वाचे ठरतात. मात्र यंदा कोणत्याही तीन विषयांना हे ग्रेस मार्क दिले जाणार आहेत. आधी 5 टक्के ग्रेस मार्क हे दोन विषयांना दिले जात होते. 2021 साली ग्रेस मार्कमुळे 9 टक्के विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले होते. यंदा ग्रेस मार्क 10 टक्के करण्यात आल्यामुळे उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.