1986 च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी येत्या 1 जून 2022 रोजी आयोजित कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबरोबरच या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी विभागवार गावोगावी बैठका घेण्याचा निर्णय आज झालेल्या बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
येत्या 1 जून रोजी कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यासंदर्भात शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिजनजीकच्या मराठा मंदिर सभागृहांमध्ये आज दुपारी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली.या बैठकीस तालुका समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार मनोहर किणेकर, एस एल चौगुले,म्हात्रू झंगरुचे, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलीक माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील,एम जी पाटील आदी उपस्थित होते.
कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी यावेळी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना हुतात्मा अभिवादनच्या कार्यक्रमासंदर्भात जनजागृती केली जावी. त्यासाठी विभागवार गावोगावी बैठका घेतल्या जाव्यात असे सुचविले. त्याचप्रमाणे तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकि झाल्यापासून नेतेमंडळी समितीच्या कार्यासाठी एकत्र फिरली नाहीत. तेंव्हा यानिमित्ताने त्यांनी गावोगावी फिरून 1 जुन हुतात्मा अभिवादनाच्या कार्यक्रमासंदर्भात जनजागृती करावी, असे आवाहन माजी आमदार किणेकर यांनी केले. तसेच हुतात्मा अभिवादन कार्यक्रमानंतर जिल्हाधिकाऱ्यांना कन्नड सक्ती मागे घेऊन सरकारी परिपत्रके मराठीत देण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी 1 जून हुतात्मा अभिवादन कार्यक्रमासंदर्भात आपले विचार व्यक्त करून समितीचे कार्यक्रम आणि बैठकांची अगदी सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना वेळोवेळी पूर्वकल्पना दिली जावी, असे सांगितले. त्याचप्रमाणे समितीच्या बैठका सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा होतात. तेंव्हा तसे न करता महिना -दीड महिन्यातून एकदा मोजक्या लोकांच्या का असेना बैठका घेतल्या जाव्यात. तसेच प्रत्येकाने तासभर का असेना या बैठकीसाठी आपल्या स्वतःच्या कामातून वेळ काढावा असे सांगून सध्याचा आपला युवावर्ग भरकटत चालला आहे. त्याला आपल्यात सामावून घेऊन नवनिर्मिती केली जावी, असे मत सरस्वती पाटील यांनी व्यक्त केले.
मराठा मंदिरात झालेल्या तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीला शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती अनेकांनी हुतात्मा दिनी हजारोनी उपस्थिती दर्शवण्याचे ठरवण्यात आले.