बेळगाव महापालिकेच्यावतीने जनतेसाठी राबविण्यात येत असलेल्या मोफत अंत्यविधी उपक्रमासाठी श्रीराम सेना हिंदुस्तानने सदाशिवनगर स्मशानभूमी येथे 5 हजार शेणाच्या गोवऱ्याची मदत देऊ केली आहे.
बेळगाव महानगरपालिकेतर्फे तळागाळातील गरीब गरजू लोकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मोफत अंत्यसंस्काराचा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे महापालिकेला सहकार्य लाभत आहे. गोरगरीब कुटुंबातील मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सदर फाउंडेशनकडून सहाय्य केले जात आहे.
या उपक्रमास प्रतिसाद देताना सदाशिवनगर स्मशानभूमीच्या ठिकाणी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी अंत्यसंस्कारासाठी शेणाच्या 5000 गोवऱ्या देऊ केल्या आहेत. याबद्दल अनगोळकर फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी यांनी बेळगाव लाईव्हला माहिती देऊन कोंडुसकर यांना धन्यवाद दिले.
रमाकांत कोंडुसकर यांनी यावेळी बोलताना महापालिकेच्या मोफत अंत्यसंस्काराचा उपक्रमाची प्रशंसा करून या उपक्रमास मदत करू इच्छिणाऱ्यांनी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी संतोष पोटे, विनायक बिर्जे, लक्ष्मण धामणेकर, भरत नागरोळी, भरमा नांगरे, प्रथमेश यादव, भागोजी शहापूरकर, अशोक राऊळ, मंजुनाथ पुजारी आदींसह अनगोळकर फाउंडेशन आणि श्रीराम सेना हिंदुस्तानचे सदस्य उपस्थित होते.