मिरज ते बेंगलोर यादरम्यान धावणाऱ्या राणी चन्नम्मा एक्सप्रेस रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून नैऋत्य रेल्वेने या रेल्वेची गती वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे बेळगावच्या प्रवाशांना मात्र धावाधाव करावी लागणार आहे.
नव्या वेळापत्रकानुसार राणी चन्नम्मा एक्सप्रेस बेंगलोरहून मिरजेसाठी 55 मिनिटे उशीरा निघणार आहे. यापूर्वी या रेल्वेचा बेळगावला 5 मिनिटे थांबा होता. तथापि नव्या वेळापत्रकानुसार ही रेल्वे बेळगावला फक्त 1 मिनिट थांबणार आहे. काल सोमवारपासून या नव्या वेळापत्रकाच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे.
राणी चन्नम्मा एक्सप्रेस बेंगलोर येथून रात्री 11 वाजता निघणार असून यशवंतपुर, तुमकुर, तिपतूर, अरसीकेरे, कडूर, बिरूर, दावणगेरे, हरिहर रानेबेन्नुर, हावेरी, हुबळी धारवाड, अळनावर, लोंढा, खानापूर मार्गे सकाळी 8:59 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावर पोचणार आहे. त्यानंतर बेळगाव होऊन 9 वाजता निघून पाच्छापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिक्कोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची, उगारखुर्द येथून दुपारी 12:10 वाजता मिरज येथे पोहोचणार आहे.
मिरज रेल्वे स्थानकातून दुपारी 12:10 वाजता निघणारी राणी चन्नम्मा एक्सप्रेस उगारखुर्द, कुडची, चिंचली, रायबाग, चिक्कोडी रोड, घटप्रभा, गोकाक रोड, पाच्छापूर मार्गे रात्री 9 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. येथून खानापूर, लोंढा, अळनावर, धारवाड, हुबळी, हावेरी, रानेबेन्नुर, हरिहर, दावणगेरे, बिरूर, कडूर अरसिकेरे, तिपतूर, तुमकुर, यशवंतपूर मार्गे सकाळी 11:10 वाजता ती बेंगलोरला पोहोचेल.
दरम्यान, बेळगावात सध्या रेल्वे मार्ग दुपदरीकरण सुरू आहे. त्याचप्रमाणे बेळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म देखील वाढविण्यात आले आहेत. राणी चन्नम्मा एक्सप्रेस दुसऱ्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर थांबत आहे. प्लॅटफॉर्मवर थांबल्यानंतर ही रेल्वे अवघ्या 1 मिनिटात निघणार असल्यामुळे ती पकडण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत व धावाधाव करावी लागणार आहे.