बेळगावात आगामी 15 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना कार्यक्रमाबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रक देऊन आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
सकल मराठा समाजातर्फे 15 मे 2022 रोजी समाजहितासाठी, समाजाच्या एकत्रीकरणासाठी व मराठा समाजाचे गुरु परमपूज्य मंजुनाथ स्वामी यांचा तेरावे धर्मगुरू म्हणून अधिकार ग्रहण समारंभ पार पडला याचे औचित्य साधत सत्कार समारंभ. असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. राजे शहाजी राजे यांनी मराठा समाजाच्या विकासासाठी बेंगलोर येथे मराठा धर्मगादी निर्माण केली या धर्मगादीची सर्व समाजाला माहिती मिळावी. आणि समाजाला उचित दिशा मिळावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमानंतरही मराठा समाजासाठी अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. भव्य प्रमाणात या कार्यक्रमासाठी समाज एकवटणार आहे. त्यासाठी नियोजनाच्या बैठकाही चालू झाल्या आहेत.ज्या कार्यकर्त्यांना स्वयंसेवक म्हणून समाजासाठी कार्यरत व्हायचे आहे त्यांनी त्वरित सकल मराठा समाजाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
बेळगाव व सीमावर्ती भाग हा गेली अनेक वर्ष भाषिक संघर्ष करत आहे. सध्या हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न लवकरात लवकर निकालात काढावा अशी मागणी ‘सकल मराठा समाज’ मानवीय भावनेतून करत आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर केलेल्या पत्रकात मराठी भाषा संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठीचा मुद्दा पहिल्या क्रमांकात आहे.
तत्पूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पत्रक देऊन सकल मराठा समाजाला सीमा प्रश्नी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती.मध्यवर्तीचे पत्रक असे
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सुकाणू समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सध्या बेळगाव शहर आणि परिसरात सकल मराठा समाज संघटना मराठा समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे.म.ए.समितीचे
पदाधिकारी आणि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी यांच्यातही
याबाबत चर्चा झाली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी आणि मराठा समाजाच्या मागण्या भिन्न आहेत.सीमा भागातील मराठा समाज आपल्या मातृभाषेच्या राज्यात विलीन होण्यासाठी झगडत आहे कर्नाटक सरकारने कोणत्याही सवलती देऊ केल्या तरी येथील समाज कर्नाटकात राहू इच्छित नाही.
उर्वरित कर्नाटकातील मराठा समाजाच्या मागण्या आणि प्रश्न भिन्नआहेत सकल मराठा समाज यासाठी जे प्रयत्न करत आहे त्याला कुणाचा विरोध असण्याचे कारणच नाही. सकल मराठा समाजाने सीमाप्रश्न आणि मराठी भाषिकांचे प्रश्न याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी म्हणजे कार्यक्रमाबाबत निर्णय घेणे सोपे जाईल असे आवाहन म.म.ए.समितीने केले आहे.