न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नी आमच्या भावना आम्ही पुन्हा एकदा स्पष्टपणे आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यासमोर मांडल्या असून सर्वोच्च न्यायालयातील खटल्यासंदर्भात तज्ञ सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली असल्याची माहिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी दिली.
दोन दिवसाच्या बेळगाव दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या खटल्यासंदर्भात चर्चा केली. पवारांच्या भेटीनंतर ज्योती कॉलेज आवारामध्ये पत्रकारांशी बोलताना दीपक दळवी यांनी उपरोक्त माहिती दिली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले की, शरद पवार साहेबांसमोर आम्ही सीमाप्रश्नी आमच्या भावना स्पष्टपणे व्यासपीठावर मांडल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन करताना सीमाभागातील मराठी आशिका नी शेतीवरचा दबाव कमी करून उद्योगधंद्यांवर जास्त लेख लक्ष केंद्रित करावे असा सल्ला दिला आहे आज बेळगाव परिसरात मराठा समाज अत्यंत प्रभावीपणे कार्य करत आहे. मात्र त्याला कोणत्या तऱ्हेचे आर्थिक सहाय्य होत नाही, सरकारचा पाठिंबा देखील नाही. सर्व अडचणींवर मात करण्यासाठी झगडणे हे बेळगावकरांकडून शिकावे, ही परिस्थिती असतानाही आज आम्ही आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत आहोत. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संस्थातून बहुजन आणि मागास समुदाय मोठ्या प्रमाणात सुशिक्षित झाला आहे, अशी माहिती दळवी यांनी दिली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यात काही अडचणी आल्यास त्या आम्ही महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते मंडळींसमोर मांडतो कारण यामध्ये मोठे अर्थकारण व सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय चालत नाही याची आम्हाला जाणीव आहे. मध्यंतरी आमच्या बाजूचे कांही वकील सेवानिवृत्त झाले. कांही वकील परदेशी निघून गेले. त्यामुळे त्यांच्या जागा भरून काढण्यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. त्या अनुषंगाने आज आम्ही माननीय शरद पवार यांच्याशी चर्चा केली.
दुर्दैवाने आमचे पाठीराखे व ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचेही अलीकडच्या काळात निधन झाले. त्यांच्या जागी आम्हाला परिचित असलेले व सतत आमच्या संपर्कात असलेले महाराष्ट्रातील नेते जयंत पाटील यांचे नांव सीमाप्रश्नाच्या तज्ञ सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून आम्ही सुचविले आहे. जयंत पाटील यांचा महाराष्ट्र मंत्रिमंडळात प्रभाव आहे, शिवाय सीमाप्रश्नी सत्तेच्या जवळ असणारी व्यक्ती आम्हाला हवी होती. यासाठी त्यांच्या नावाला आम्ही प्राधान्य दिले आहे. साधारण त्यांच्या नावाला मंजुरी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे दीपक दळवी यांनी सांगितले.
समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी कोरोना प्रादुर्भावाचा संकटामुळे सीमाप्रश्नाच्या खटल्याचे काम प्रलंबित राहिले आहे याखेरीज तज्ञ सल्लागार समितीची बैठक देखील गेल्या दोन वर्षात झालेले नाही तेव्हा सदर समितीची बैठक बोलावण्यात यावी आणि प्रलंबित असलेल्या खटल्याच्या कामकाजात गती मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती देऊन सीमाप्रश्नाच्या बाबतीत आम्ही महाराष्ट्र सरकारच्या बाजूने लढू आणि जिंकू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला असल्याचे सांगितले. याप्रसंगी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, आर. आय. पाटील आदी उपस्थित होते