केएलई संस्थेच्या डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या एमबीएच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय पातळीवरील व्यवस्थापन महोत्सवांमध्ये स्पृहणीय यश संपादन केले आहे.
डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सुषमा राणे, सुषमा कोले आणि बरूषा डी रेगो या विद्यार्थिनींनी नॅशनल लेव्हल मॅनेजमेंट फेस्ट अर्थात राष्ट्रीय पातळीवरील व्यवस्थापन महोत्सवातील मानव संसाधन स्पर्धेत पाच फेऱ्या यशस्वीरीत्या पार करून महाअंतिम फेरी गाठली.
महाअंतिम फेरीमध्ये देखील या तिघींच्या संघाने सर्वोत्तम कामगिरी नोंदविल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या पद्धतीने त्यांनी स्पर्धेत सहभागी 19 संघांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
या तिघींच्या प्रभावी व्हिडिओ सादरीकरणाची देखील प्रशंसा झाली. या व्हिडिओला समाज माध्यमाच्या मंचावर सर्वाधिक लाइक्स मिळाल्या आहेत. उपरोक्त तिघांनीही पहिल्या फेरीपासून महाअंतिम फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवून वर्चस्व राखले होते.
सदर यशाबद्दल केएलई एमबीए विभाग प्रमुख डॉ. प्रयाग गोखले यांनी सुषमा राणे, सुषमा कोले आणि बरूषा डी रेगो या तिघांचेही खास अभिनंदन करून शाबासकी दिली. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बसवराज कटगेरी यांनीही या तिन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.