शहीद जवान प्रशांत जाधव याला बेळगाव विमान तळावर अभिवादन करण्यात आले.लडाखच्या तुर्तक सेक्टरमध्ये भारतीय लष्कराची बस नदीत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत कोल्हापूर जिल्ह्यातील बसर्गे बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील जवान प्रशांत शिवाजी जाधव (वय 27)हा शहीद झाला होता.
दरम्यान,शहिद जवान प्रशांत जाधव यांचे पार्थिव रविवारी (दि. 29) सकाळी 8.30 वाजता स्पाईस जेटच्या खास विमानाने बेळगावच्या सांबरा विमानतळावर आणण्यात आले यावेळी मराठा सेंटर आणि विमान तळाच्या वतीने जवानाला मानवंदना देण्यात आली त्यानंतरतेथून पुढे बसर्गे या मूळ गावी पार्थिव नेण्यात आले.
पालकमंत्री गोविंद कारजोळ, आमदार अनिल बेनके,बेळगाव विमानतळावर विमानतळाचे संचालक राजेश कुमार मौर्य,डी सी पी रवींद्र गडादी आणि भारतीय वायू दलाच्या आणि मराठा सेंटर अधिकाऱ्याने जवानाला मानवंदना दिली
प्रशांत हे सन 2014 मध्ये बेळगाव येथे 22 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ते आपल्या बटालियनसह लष्करी वाहनातून परतापूरहून उपसेक्टर हनिफकडे जात होते.
यावेळी त्यांची बस खोल दरीतील श्योक नदीत कोसळली. या अपघातात प्रशांत यांचा मृत्यू झाल्याची बातमी दुपारी त्यांच्या गावात पोहोचली. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबीयांना एकच धक्काच बसला आहे
प्रशांत यांचा विवाह जानेवारी 2020 मध्ये झाला होता. त्यांना अकरा महिन्यांची मुलगी आहे. पत्नी पद्मा व मुलगी नियती हिच्यासह ते जामनगर (गुजरात) येथे दोन महिन्यापूर्वी वास्तव्यास होते. गावी वडील शिवाजी व आई रेणुका असा परिवार आहे.