बहुजन समाजाचा मानबिंदू असलेल्या आणि सहकार क्षेत्रात 80 वर्षे पूर्ण करणाऱ्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा अमृत महोत्सवी सोहळा येत्या बुधवार दि. 11 मे 2022 रोजी साजरा केला जाणार असून या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी दिली.
मराठा बँकेच्या बँकेच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या अनुषंगाने चेअरमन दिगंबर पवार यांनी बँकेची स्थापना आणि आजपर्यंतचा बँकेचा आजवरच्या प्रवासात संदर्भात पुढील प्रमाणे माहिती दिली. बेळगाव परिसरातील बहुजन समाजाचा मानबिंदू असलेल्या मराठा बँकेची स्थापना 1942 आली झाली असून आज या बँकेला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1942 साली बहुजन समाजाला व्यापार-उद्योग शिक्षण व घरबांधणी इत्यादी साठी सहाय्य करणारी एखादी आर्थिक संस्था असावी ही निकड लक्षात घेऊन राष्ट्रवीरचे माजी संपादक कै. गुरुवर्य शामराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रंगुबाई पॅलेस येथे बहुजन समाजातील नेते मंडळींची बैठक होऊन पांगुळ गल्ली येथे भाड्याने घेतलेल्या एका लहानशा जागेत सर्व प्रथम दि मराठा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा पांगुळ गल्ली येथील एका छोट्या जागेत मराठा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या नावाने सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यावेळी सोसायटीचे पहिले चेअरमन म्हणून कै. नागोजीराव मिसाळ यांची निवड करण्यात आली.
केवळ 104 सभासदांसह 3500 रुपये भाग भांडवलावर ही सोसायटी सुरू करण्यात आली. पहिली दोन वर्षे संस्थेला नुकसानीतच व्यवहार करावा लागला. त्यानंतर विश्वासाहर्ता आणि पारदर्शक व्यवहाराच्या जोरावर ही सोसायटी लोकप्रिय झाली. 1948 साली कै. गजाननराव भातकांडे चेअरमन असताना या सोसायटीचे बँकेत रुपांतर करण्यात आले. तेंव्हापासून बँक झपाट्याने प्रगती करू लागली. बँकेला स्वतःची इमारत असावी असे तत्कालीन संचालकांना वाटू लागले. तेव्हा 1959 साली प्रथम नरगुंदकर भावे चौक येथे जागा खरेदी करून स्वतःच्या इमारतीत बँक सुरू करण्यात आली. कालांतराने ती जागा देखील अपुरी पडू लागल्यामुळे 1977 साली बसवाण गल्लीतील सुंठकर वाडा 39 हजार रुपयांना खरेदी करण्यात आला.
वाड्यातील जुने सामान 21 हजार रुपयाला विकले गेल्यामुळे बँकेला केवळ 16 हजार रुपयांमध्ये वाड्याची जागा मिळाली. त्यानंतर अवघ्या तीन वर्षात या जागेत भव्य इमारत उभारण्यात आली. यासाठी तत्कालीन ज्येष्ठ संचालक कै. अर्जुनराव घोरपडे, कै. शिवाजीराव काकतकर, कै. बाळकृष्ण भातकांडे, कै. अर्जुनराव हिशोबकर, कै. सदाशिवराव हंगिरगेकर, कै. परशराम हंडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. शहरातील अडत व्यवसाय मार्केट यार्ड येथे गेल्यानंतर 1973 साली व्यापाऱ्यांची अडचण ओळखून मार्केट यार्ड येथे मराठा बँकेने स्वतःच्या जागेत आपली शाखा सुरू केली.
मराठा बँकेने रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव साजरे केले असून आता अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. गेल्या 2017 साली बँकेला 75 वर्षे पूर्ण झाली असून यंदाचे बँकेचे हे 80 वे वर्ष आहे. कोरोना महामारीमुळे अमृत महोत्सव साजरा करण्यास उशीर झाला आहे. बँकेला यापूर्वी केंद्रीय मंत्री शरद पवार, अण्णासाहेब शिंदे, वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, रणजित देसाई, सुशीलकुमार शिंदे, यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब पुरंदरे, शंकरराव चव्हाण, दत्ता बाळ, उदयसिंहराव गायकवाड, सुप्रसिद्ध पैलवान सतपाल, बॅ. पी. जी. पाटील न्यायाधीश कोळसे -पाटील, अजित सेठ, मल्लिकार्जुन खर्गे, विलासराव देशमुख, बाबासाहेब कुपेकर, दिग्विजय खानविलकर, ॲड. उज्वल निकम, सतीश पाटील, युवराज संभाजीराजे, रंगनाथन, सदाशिवराव मंडलिक, एच. के. पाटील, आमदार राजेश पाटील आदी मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
मराठा को-ऑप. बँक लिमिटेडच्या सध्या 6 शाखा कार्यरत असून बेळगाव परिसरात आणखी शाखा वाढविण्याचा बँकेचा मानस आहे. सध्या असलेल्या शाखांपैकी बँकेच्या स्वतःच्या जागेत तीन शाखा असून अन्य तीन शाखा भाडेतत्त्वावरील जागेत चालू आहेत. मराठा बँकेला यापूर्वी ‘उत्कृष्ट सहकारी बँक’ त्याचप्रमाणे ‘बेस्ट स्वनिधी असलेली बँक’ म्हणून गौरविण्यात आले आहे. बँकेला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. अमृतमहोत्सव साजरा करण्याबाबत गेल्या दोन-तीन वर्षात कोरोनामुळे अडचणी आल्या त्यामुळे सदर कार्यक्रमाला उशीर झाला आहे.
मात्र आता येत्या बुधवार दि. 11 मे 2022 रोजी सकाळी 8 वाजता हा सोहळा होणार आहे. ज्येष्ठ कामगार नेते कॉ. कृष्णा मेणसे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी स्पष्ट केले आहे.