धामणे (ता. जि. बेळगाव) येथे गुरुवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. या घटनेचा बाऊ करत मराठी तरुणांना लक्ष्य करताना गावातील 8 युवकांना मारहाणीच्या गुन्ह्यात गोवण्यात आल्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
धामणे गावातील शिवप्रेमी जनतेने गेल्या कित्येक वर्षापूर्वी गावाच्या एका भागाचे नामकरण संभाजीनगर असे करून त्या ठिकाणी धर्मवीर छ. संभाजी महाराजांचा पुतळा बसविला आहे. मात्र अलीकडे कांही चन्नम्माप्रेमींनी त्या नगराचे नामकरण राणी चन्नम्मानगर असे करून नवा फलक उभारला आहे.
त्यामुळे गेले कित्येक दिवस धामणे आतल्या आत धुमसत होते. गावामध्ये अस्वस्थता दाटून होती. उघड उघड नसला तरी अंतर्गत क्षोभ वाढला होता. या क्षोभाचा स्फोट होण्यास निमित्त झाली गेल्या गुरुवारी रात्री गावात काढण्यात आलेली लग्नाची वरात. तोफेत ठासून भरलेल्या दारूचा जसा विस्फोट व्हावा अशी घटना वरातीवेळी घडली.
गावातील छ. संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून गुरुवारी रात्री वरात पुढे सरकत असताना फटाक्यांची आतषबाजी करत कन्नड गाणी लावून वरातीतील युवक बेभान नाचत होते. त्यावेळी तेथे रस्त्याकडेला कट्ट्यावर बसलेल्या शिवप्रेमींना सदर प्रकार जाणून-बुजून कुरापत काढण्यासाठी केला जात आहे, असा संशय आला. यात भर म्हणून फटाक्यांची आतषबाजी करताना हुक्क्यांचे फटाके जाणून-बुजून छ संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या रोखाने लावले जात असल्याचे लक्षात येताच उपस्थित शिवप्रेमींची मस्तकं तापली. मात्र तरीही डोके शांत ठेवून त्यांनी पुतळ्याला क्षती पोहोचेल असे फटाके लावू नका, अशी विनंती वरातीतील युवकांना केली.
यातूनच वादाला सुरुवात झाली आणि त्याचे पर्यवसान मारहाणीच्या घटनेत झाले. परिणामी प्रकरण विकोपाला म्हणजे पोलिस ठाण्यापर्यंत गेले आणि मराठी युवकांवर गुन्हे दाखल झाले.
या प्रकरणात एका बाजूला प्रशासकीय यंत्रणा आणि दुसर्या बाजूला मराठी युवक अशी दोन विरुद्ध टोकं एकमेकांसमोर आली असताना कन्नड धार्जिण्या सरकारने पुन्हा एकदा मराठी युवकांवर गुन्हे नोंदवून आपले मराठी विरोधी धोरण स्पष्ट केले आहे. निवडणूका 6 महिन्यावर आल्या आहेत. तेंव्हा याबाबतीत राज्यकर्ते कोणती भूमिका घेणार? याकडे मराठी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. छ. संभाजी महाराज हे अवघ्या भारताचे राजे होते. महाराजांचा अवमान कोणताही भारतीय सहन करणार नाही. धामणे प्रकरणात पोलिसांनी समाज हिताची भूमिका घेणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनी मवाळ धोरण न स्वीकारता पुढाकार घेऊन आपली भूमिका स्पष्टपणे मांडणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही. या पार्श्वभूमीवर मराठी जनतेचे होणारे दमन रोखण्यासाठी भविष्यात निवडणूक मतांच्या माध्यमातून अशा प्रकारांना चोख उत्तर दिले जावे अशी भावना मराठी भाषिकांमध्ये व्यक्त होत आहे.