फेटा बांधून घेणे किंवा बांधणे ही फक्त पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात अवरीत सुमारे 14 वर्षे फेटे बांधण्याचे कार्य करून बेळगाव जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी नांवलौकिक कमावलेल्या बेळगावच्या कांचन किसन शहापूरकर यांची राज्य पातळीवरील यंदाच्या कर्नाटक रत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
श्री अम्मा प्रतिष्ठान व थोर समाजसेवक गरीबांचे कैवारी श्री बाळासाहेब कल्लाप्पा उद्घगट्टी यांच्या हस्ते येत्या गुरुवार दि. 16 जून रोजी कांचन शहापूरकर यांना कर्नाटक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. फेटा बांधणे ही एक अतिशय कौशल्यपूर्ण कला आहे. फेटे बांधून घेणे किंवा बांधणे हे एकेकाळी फक्त पुरुषांची मक्तेदारी असणारे क्षेत्र आता महिलांनी काबीज करण्यास सुरुवात केले आहे. कांचन शहापूरकर या शिवाजीनगर पाचवी गल्ली येथील रहिवासी असून गेल्या सुमारे 14 वर्षापासून त्या फेटे बांधण्याचे कार्य करतात. मराठी मुलामुलींची शाळा क्र. 5 चव्हाट गल्ली आणि जिजामाता हायस्कूल या शाळेच्या विद्यार्थिनी असलेल्या कांचन यांच्यात सातव्या -आठव्या इयत्तेत असताना फेटे बांधण्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर शाळेत दहावीत असल्यापासून खऱ्या अर्थाने आपण पद्धतशीरपणे फेटा बांधण्यास शिकलो आणि त्यानंतर आजतागायत लाखो लोकांना मी फेटे बांधले आहेत, असे कांचन शहापूरकर यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.
कांचन यांनी दिलेल्या माहितीनुसार फेटे बांधण्याचे क्षेत्रात फक्त पुरूषच का असतात महिला का नाही? असा विचार करून त्यांनी फेटे बांधण्याच्या कलेत रस घेण्यास सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात दुर्गामाता दौडमध्ये सेवा म्हणून त्यानी फेटे बांधण्यास आरंभ केला. त्यानंतर अल्पावधीतच त्यांचे झटपट दिमाखदार फेटे बांधण्याचे कौशल्य लोकप्रिय झाले. बेळगावसह परगावातील अनेक सभा, समारंभ उत्सव, कुस्त्यांचे मैदान, म्हशी पळवणे, बैलगाडी शर्यत, आदीप्रसंगी त्यांना फेटे बांधण्यासाठी आग्रहाने निमंत्रित केले जाते. बेळगाव, खानापूर कारदगा आदी परिसरासह थेट म्हैसूर, बेंगलोरपर्यंतच्या विविध कार्यक्रम, समारंभांना कांचन शहापूरकर यांना निमंत्रित केले जाते. लग्न व इतर कार्यक्रमाप्रसंगी पैसे घेणाऱ्या कांचन गणेशोत्सव, शिवजयंती, दौड यासारखे सामाजिक कार्य असेल तर पैशाची अपेक्षा ठेवत नाहीत.
गोव्यातील चित्रपट महोत्सवाप्रसंगी अमोल पालेकर, वर्षा उसगावकर आदी चित्रपट कलाकारांना फेटे बांधलेल्या कांचन यांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, सिद्धरामय्या, छत्तीसगडचे मुख्यमंत्री, पतंजलीचे बाबा रामदेव आदी दिग्गज मंडळींना फेटे बांधण्याचा सन्मान मिळविला आहे. बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगरसेवक या लोकप्रतिनिधींना फेटे बांधण्याचे त्यांचे काम तर बारा महिने सुरूच असते.
हिंदू संस्कृती विशेष करून मराठी संस्कृतीमध्ये भेट्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही महत्व अबाधित रहावे हा देखील फेटे बांधण्याचे कार्य करण्यामागचा आपला मुख्य उद्देश असल्याचे कांचन शहापूरकर यांनी सांगितले. फेटे बांधण्याच्या त्यांच्या अवरीत कार्याची दखल घेऊन आता त्यांना राज्यस्तरीय ‘कर्नाटक रत्न’ पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.