बेळगाव शहरातील मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन व संचालकांनी आज नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांना उद्या बुधवारी साजरा केल्या जाणाऱ्या बँकेच्या अमृतमहोत्सवी समारंभाचे निमंत्रण दिले.
बेळगावच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लि.चा वर्धापन समारंभ उद्या बुधवार दि. 11 मे 2022 रोजी सकाळी 8 वाजता साजरा केला जाणार आहे. कॉ. कृष्णा मेणसे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
यासंदर्भात मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांच्या नेतृत्वाखालील संचालकांच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकार्यालयामध्ये नव्याने पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेतली.
या भेटीप्रसंगी सर्वप्रथम बेळगाव सारख्या मोठ्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाल्याबद्दल नितेश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांना बँकेच्या अमृतमहोत्सवी समारंभाचे निमंत्रण देण्यात आले. जिल्हाधिकारी पाटील यांनी निमंत्रणाचा स्वीकार करून समारंभाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.
प्रारंभी विकास कलघटगी यांनी मराठा बँकेचे चेअरमन पवार व उपस्थित अन्य संचालकांची ओळख करून दिली. यावेळी संचालक बाळासाहेब काकतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लि. या आपल्या बँकेबद्दल थोडक्यात माहिती देताना मराठा बँक ही बेळगावच्या सहकार क्षेत्रातील अग्रेसर बँक असल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी तसेच होतकरू लोकांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे हे आपल्या बँकेचे ब्रीद आहे. आधुनिक युगाशी जुळवून घेताना बँकेच्या कामकाजाचे संपूर्ण डिजिटलायझेशन करण्यात आले असल्याचे सांगितले. याप्रसंगी चेअरमन दिगंबर पवार यांच्यासह सुशील कुमार खोकाटे आणि बँकेचे जनरल मॅनेजर संतोष धामणेकर उपस्थित होते.