Saturday, December 21, 2024

/

समाजात एकता नाही तर उद्धार नाही -पू. श्री मंजुनाथ स्वामीजी

 belgaum

आजच्या आधुनिक युगात अध्यात्मा बरोबरच समाजकारण व राजकारण ही समाजाच्या रथाची दोन चक्रे आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या रथाचा चालक म्हणजे समाजाचा गुरु होय. त्यामुळे त्यांच्या शिवाय समाजाचे हित साधू शकत नाही. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे समाजात एकता होत नाही, जोपर्यंत सर्व जण एकाच छताखाली येत नाहीत तोपर्यंत समाजाचा उद्धार होणार नाही, असे मार्गदर्शनपर विचार मराठा समाजाचे बेंगलोर गोसावी मठाचे 7 वे मठाधीश जगद्गुरु वेदांताचार्य परमपूज्य मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी व्यक्त केले.

सकल मराठा समाज बेळगाव यांच्यावतीने वडगाव येथील आदर्श विद्यामंदिरच्या मैदानावर अभूतपूर्व उत्साहात परमपूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामी यांचा गुरुवंदना कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी गुरुवंदना स्वीकारल्यानंतर पूज्य मंजुनाथ स्वामी बोलत होते.

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बेळगाव शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील हे होते. आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना पु. श्री मंजुनाथ स्वामीजी यांनी आपला अध्यात्मिक प्रवास बेळगावातून सुरू झाला. मला जगामध्ये जगायचे कसे? हे शिकवणारे वैराग्य आणि संन्यासी कशासाठी झाले पाहिजे? हे मला बेळगावने शिकवले आहे असे सांगून आपले गुरू कंग्राळी बी. के. येथील होते. बालपणी वयाच्या सहाव्या -सातव्या वर्षी कंग्राळी येथील आपल्या त्या गुरुनी आपल्याकडून श्रीमद् भगवद् गीतेतील सातशे स्तोत्रं पाठ करून घेतली होती अशी माहिती दिली. मराठा समाजाचा गुरु व्हावे असे माझे विचार नव्हते, जे घडले ते ईश्वर कृपेने असे सांगून रथाप्रमाणे समाजाचा उद्धार होण्यासाठी समाजकारण व राजकारण ही दोन चक्रे बळकट असायला हवीत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे समाजाचा हा रथ चालविणारा चालक तितकाच बळकट असायला हवा. यासाठीच समाजाला गुरु लागतो. राजकारण, समाजकारण आणि अध्यात्म वेगवेगळे असले तरी या सर्वांची गरज समाजाला असते. या सर्वाना एकत्र करणारा सर्वांचा आत्मा म्हणजे गुरु आहे.

प्रत्येक समाजाला गुरुची आवश्यकता असते. इतर समाजाकडे पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की गुरूंचे मत प्रमाण मानून त्यांच्या मार्गदर्शनानुसार मार्गक्रमण केल्यास समाजाचा उद्धार होऊ शकतो अन्यथा समाजाचा विनाश अटळ असतो. समाजात एकता होत नाही, जोपर्यंत सर्वजण एकाच छता खाली येत नाही तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. याच प्रमाणे सर्वसामान्य गरीब लोकांपासून मोठ्या उच्चपदस्थ श्रीमंत लोकांपर्यंत सर्वांना आपण किंमत दिली पाहिजे असे सांगून ईश्वरप्राप्तीसाठी अर्थात परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपल्या सर्व इंद्रियांवर आपले नियंत्रण असले पाहिजे, असेही जगद्गुरु वेदांतचार्य परमपूज्य मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी स्पष्ट केले.Manjunath swamy ji

आज सकाळी गुरुवंदना कार्यक्रमानिमित्त आयोजित शोभायात्रा समाप्त झाल्यानंतर आदर्श विद्या मंदिर वडगाव येथील कार्यक्रम स्थळी आगमन झालेल्या परमपूज्य मंजुनाथ भारती स्वामीजी, नुलचे भगवान गिरी महाराज, काशीचे स्वामी सोहम चैतन्य पुरी वेदांत चार्य महाराज, रुद्र केसरी मठ बेळगावचे पूज्य हरी गुरु महाराज यांना संयोजक मंडळाच्या सदस्यांनी सन्मानाने व्यासपीठावर आणले. याप्रसंगी व्यासपीठावर कर्नाटकचे माजी मंत्री व मराठा समाजाचे नेते विद्यमान आमदार श्रीमंत पाटील बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके, खानापूरचे आमदार अंजलीताई निंबाळकर, भाजप मोर्चाचे अध्यक्ष किरण जाधव, श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल, माजी महापौर शिवाजी सुंठकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. व्यासपीठावर आल्यानंतर श्री मंजुनाथ स्वामीजी यांनी प्रथम छत. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने गुरुवंदना कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

आपल्या स्वागतपर भाषणात सकल मराठा समाज बेळगावचे गुणवंत पाटील यांनी गुरुवंदना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सर्वांचे स्वागत केले. किरण जाधव यांनी प्रास्ताविकात गुरुवंदना कार्यक्रम, बेळगावच्या सकल मराठा समाजाचे उद्दिष्ट, संघटीत मराठा समाजाचे महत्त्व याबाबत माहिती दिली. व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय अनंत लाड यांनी करून दिला. यानंतर पूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांची पाद्यपूजा करण्याबरोबरच ‘गुरुवंदना’ म्हणून सकल मराठा समाज बेळगावतर्फे त्यांचा जाहीर सन्मान करण्यात आला.Guruvandana

यावेळी बोलताना बेळगाव सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देण्याबरोबरच महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे मराठा समाजातील होतकरू उदयोन्मुख खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावे यादृष्टीने बेळगावच्या सकल मराठा समाजाने योजना आखून कार्यवाही सुरू केली असल्याचे सांगून बेळगावातील सकल मराठा समाज स्थापनेमागचा उद्देश स्पष्ट केला.

खानापूरचे आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी शिवगर्जनासह आपल्या भाषणाला प्रारंभ करताना मराठा समाजाने सामाजिक व आर्थिक प्रगती साधली पाहिजे आणि त्यासाठी गुरूंचा आशीर्वाद आवश्यक आहे. कर्नाटकात विस्कळीत झालेला मराठा समाज एकत्रित करणे ही काळाची गरज असल्याचे असल्याचे सांगून आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.

बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी मोडेल पण वाकणार नाही या वृत्तीमुळे मराठा समाजाला उत्तर आणि दक्षिण भारतात मानसन्मान दिला जातो. याला कारणीभूत छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला इतिहास असल्याचे सांगितले. तेंव्हा मराठा समाज बांधवांनी आपण छ. शिवाजी महाराजांचे वंशज आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. मराठा समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे हा समाज इतर समाजाला सोबत घेऊन प्रगती करतो असे ते म्हणाले. SAkal maratha

देशात हिंदू संस्कृती टिकवण्याचे 100 टक्के कार्य कोणी केले असेल तर ते मराठा समाजाने असे सांगून आपल्या समाजाने शिक्षणामध्ये ही पुढे आले पाहिजे. नजीकच्या काळात ती कमतरता देखील भरून निघेल. मराठा समाजाला राखीवता मिळाले पाहिजे अशी जोरदार मागणी आहे. मात्र तत्पूर्वी आपण आपल्या समाजासाठी काय करू शकतो, याचा विचार प्रत्येक मराठा समाज बांधवांनी करावा असे आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले.

मराठा समाजाचे तडफदार युवा नेते रमाकांत कोंडुसकर यांनी आपल्या समयोचित भाषणे शिक्षण, सामाजिक तसेच अन्य क्षेत्रात मराठी समाज बांधवांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे असे सांगितले. छ. शिवाजी महाराजांनी जशी बादशहा औरंगजेबावर मात केली. त्याप्रमाणे औरंगजेबाच्या आजकालच्या अवलादींना ठेचण्यासाठी मराठा समाजाने संघटीत होणे गरजेचे आहे, असे परखड मतही कोंडुसकर यांनी व्यक्त केले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपले विचार व्यक्त केले.

वडगाव येथील आदर्श विद्या मंदिर येथे पार पडलेल्या सकल मराठा समाजाच्या आजच्या गुरुवंदना कार्यक्रमास बेळगाव शहरासह जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने अलोट गर्दी केली होती. तथापि अतिशय नियोजनबद्धरीत्या संयोजकांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. सदर गुरुवंदना कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे बेळगाव पोलीस प्रशासनाने देखील उत्तम सहकार्य करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.