हालगा (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षपदी सदानंद बसवंत बिळगोजी यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड जाहीर होताच बिळगोजी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होण्याबरोबरच समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.
हालगा ग्रामपंचायत नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सदानंद बसवंत बेळगोजी यांचा श्री धर्मराज मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने उस्फुर्त सत्कार करण्यात आला. यावेळी गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे गावातील शिंदे परिवारातर्फे देखील बिळगोजी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अनिल शिंदे यांनी नूतन ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बिळगोजी यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा गौरव केला. हालगा ग्रा. पं. उपाध्यक्ष असताना विविध प्रकारची कामे करत बेळगोजी यांनी गावं सुधारण्याचे कार्य केले आहे.
जनसेवा हीच ईश्वर सेवा अशी भावना उराशी बाळगून जनहितासाठी सदैव कार्यतत्पर असणारे सदानंद बेळगोजी यांच्या स्वरूपात एक झुंझार नेतृत्व हालगा गावाला ग्रा. पं. अध्यक्ष म्हणून लाभले आहे. श्री धर्मराज मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्षपद सांभाळताना दानशूर व्यक्तिमत्त्वाच्या सदानंद बिळगोजी यांनी गोर गरीब व सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व केले आहे. ते विद्यार्थ्यांच्या आशेचे किरण आणि शेतकऱ्यांचे स्नेही म्हणून ओळखले जातात असे सांगून हालगा गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे मित्र सदानंद बेळगोजी यांना आई तुळजा भवानी कुठल्याही प्रकारच्या कार्यात यश देवो, अशा शुभेच्छा अनिल शिंदे यांनी दिल्या.
ग्रा. पं. अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना सदानंद बसवंत बेळगोजी यांनी प्रथम अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावकर यांचे आभार मानले.
तसेच गावच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून माझ्या सहकारी ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन मी गावातील प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील असे सांगितले. प्रामुख्याने गावातील पाणीपुरवठा योजना भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे कार्यरत राहील यादृष्टीने प्रयत्न करण्यावर आपला अधिक भर असेल, असेही अध्यक्ष बिळगोजी यांनी स्पष्ट केले.