जायंट्स मेन ही सामाजिक संस्था सदगुरुनी सुरू केलेली माती वाचवा चळवळ प्रत्येकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत असणार आहे.
सद्गुरूंनी या चळवळीतुन जगभरातील राजकीय मंडळी, सामाजिक संस्था आणि नागरिकांपर्यंत मातीची गुणवत्ता आणि संवर्धनाबद्दलची माहिती पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे त्याला अनुसरून जायंट्स इंटरनॅशनलच्या कर्नाटक फेडरेशन सहा अंतर्गत ही संकल्पना संपूर्ण कर्नाटकातील नागरिकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या कामाची सुरुवात जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनने केली आहे.नुकत्याच दमन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात या सामाजिक प्रकल्पाची सुरुवात झाली.यावेळी जायंट्स मेनच्या सदस्यांनी हिरव्या रंगांचे सेव्ह सॉईलबद्दल आवाहन केलेले टीशर्ट आणि टोप्या परिधान केल्या होत्या.
हजारों वर्षांपासून पृथ्वीवरील जीवन पृथ्वीच्या कवचावर असलेल्या सुपीक मातीच्या पातळ थरामुळे टिकून आहे पण शेती करून त्यातून सतत पीक काढणे जंगल तोड यामुळे जमिनीचा ऱ्हास होत चाललाय.
जागतिक स्तरावर आधीच 52 टक्के जमीन निकृष्ट आहे. रासायनिक खतांचा अतिवापर आणि सततच्या पीक काढणीमुळे जमीन निकृष्ट होत चालली आहे हे असेच चालू राहिल्यास भविष्यात अन्नधान्याची भीषण टंचाई भासेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.हवामान बदल,वायू प्रदूषण आणि पाण्याची टंचाई यावर बऱ्याच जणांन काम करताना पाहिलं आहे पण फार कमी लोकांनी मातीवर लक्ष केंद्रित केले आहे.
सद्गुरूंनी सुरू केलेल्या माती वाचवा या माध्यमातून मातीशी संबंधित धोरण तयार करून ते अंमलात आणण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. लागवडीयोग्य सेंद्रिय घटक वाढविण्यासाठी उपाययोजना आखण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत.
या चळवळीच्या शुभारंभ प्रसंगी आंतरराष्ट्रीय अध्यक्षा शायना एन सी यांनी जायंट्स मेनच्या कार्याचे कौतुक करताना माती वाचवा संकल्पना गरजेची असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, अनंत लाड, मदन बामणे, शिवराज पाटील, उमेश पाटील,अशोक हलगेकर, सुनिल भोसले, संजय सुर्यवंशी,अरविंद देशपांडे, विनोद आंबेवाडीकर, विजय बनसुर, विजय पाटील, पांडुरंग पालेकर, मधू बेळगावकर,गावडू पाटील,आनंद कुलकर्णी, भास्कर कदम व इतर उपस्थित होते.