रहदारी पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन महापालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने फुटपाथवरील अतिक्रमीत व्यवसायांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडल्यामुळे बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील फूटपाथनी आज शनिवारी मोकळा श्वास घेतला.
बेळगाव महापालिकेच्या सहकार्याने रहदारी पोलिसांनी आज शनिवारी सकाळी सकाळीच सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहीम अंतर्गत फुटपाथवरील अतिक्रमणे हटवून फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळा करून देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फुटपाथवर कसलीही दुकाने अथवा व्यवसायात थाटू नयेत असा नियम आहे. मात्र बेळगावातील मध्यवर्ती बसस्थानक (सीबीटी) परिसरात अनेक वर्षापासून फुटपाथवर रस्त्याकडेला बिनदिक्कत अनेक प्रकारची दुकाने व व्यवसाय थाटण्यात आले आहेत त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने रस्त्यावरून चालत जावे लागत होते.
परिणामी वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच किरकोळ अपघात देखील घडत होत. याची गांभीर्याने दखल घेऊन आमदार ॲड. अनिल बेनके यांनी फुटपाथवरील दुकाने हटविण्याची सूचना महापालिका व संबंधित अधिकाऱ्यांना केली होती. तथापि अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
आमदारांच्या सूचनेची दखल घेऊन रहदारी पोलिसांनी मात्र महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने आज शनिवारी जोरदार मोहीम राबवून सीबीटी परिसरातील फुटपाथवरील दुकाने व त्यांनी अतिक्रमणे हटविली. रहदारी पोलीस निरीक्षक श्री शैल गाबी यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही मोहीम यशस्वी केली. त्यामुळे या परिसरातील फूटपाथनी आज मोकळा श्वास घेतला आहे.