शेतीच्या खरीप हंगामाला प्रारंभ झाला की शेतातील सुक्या चाऱ्याची उचल केली जाते. मात्र गेल्या वर्षापासून भाताच्या सुक्या चाऱ्याला मागणीच नसल्यामुळे यंदा देखील शेतकऱ्यांवर अत्यंत दुःखी मनाने तो चारा शेतातच जाळून टाकण्याची वेळ आली आहे.
सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे. त्यामध्ये भरीसभर म्हणून वेळी-अवेळी पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग संबंधित शेतीची कामे उरकण्यात व्यस्त झाला आहे. रोहिणी नक्षत्र तोंडावर आल्यामुळे भात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
हातात असलेली शेतीची कामे पूर्ण करणे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त आहे. त्याच अनुषंगाने शेतातील सुका चारा हलविणे गरजेचे बनले आहे. हा सुका चारा शेतकरी आपल्या जनावरांसाठी वापरतात. मात्र ज्यांची जनावरे नाहीत अशा शेतकऱ्यांच्या शेतातील भाताच्या सुक्या चाऱ्याची आजूबाजूच्या तसेच पूर्व-पश्चिम भागातील शेतकऱ्यांकडून उचल केली जाते.
सुक्या चाऱ्याची ही उचल गेल्या वर्षापासून थंडावली आहे. गेल्या वर्षापासून भाताच्या सुक्या चाऱ्याला मागणीच नसल्यामुळे शेतकऱ्यांवर अत्यंत दुःखी मनाने तो चारा शेतातच जाळून टाकण्याची वेळ आली आहे. परिणामी यंदा देखील शहापूर, येळ्ळूर, अनगोळ, धामणे व वडगाव शिवारामध्ये भाताच्या सुक्या चाऱ्याच्या गंज्या जळताना दिसत आहेत.