कर्नाटकमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था स्थापन करण्यास केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.
कर्नाटकचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली. या संदर्भात बोलताना मंत्री सुधाकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी कर्नाटकात एम्स नेटवर्कच्या स्थापण्याचे आश्वासन दिले आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
एम्सच्या स्थापनेमुळे राज्याला मोठा फायदा होणार असून राज्यातील आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण अधिक प्रगत होण्यास मदत होणार आहे. आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी दिलेल्या या माहितीमुळे बेळगावमध्ये एम्स स्थापण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बेळगाव जिल्ह्यात 14 तालुके असून हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्याचप्रमाणे बेंगलोरनंतर 73 टक्के साक्षरतेसह सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. मात्र या सर्वात मोठ्या जिल्ह्यामध्ये सध्या बेंगलोरमध्ये आहे तशी परवडणारी सरकारी आरोग्य सेवा प्रणाली नाही. येथील सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती देखील फारशी चांगली नाही.
विभागीय आयुक्तांची या ठिकाणी प्रशासक नेमणूक झाल्यानंतर या हॉस्पिटलला चांगले दिवस आले असले तरी या ठिकाणी गरिबांसाठी उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवेची कमतरता आहे. एआयआयएमएस या ठिकाणी विशेष काळजीसह उत्तम दर्जाचे उपचार अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देऊ शकते. याचा फायदा येथील समाजाला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.