लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे महत्वाकांशी स्मार्ट सिटी योजनेत असलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या शववाहिकांची इतकी दुरावस्था झाली आहे की मृतदेहांना घेऊन जाणारी शववाहिकाच व्हेंटिलेटरवर असल्याचे पहावयास मिळत आहे.
शहरात मयत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी बेळगाव महानगरपालिकेकडून शववाहिकेची सोय करण्यात येते. बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी योजनेत अंतर्भाव झाल्यामुळे त्या अनुषंगाने कोट्यावधी रुपये खर्च करून विकास कामे राबविली जात आहेत.
मात्र हे करत असताना स्मार्ट सिटीचा एक महत्त्वाचा भाग असणाऱ्या उत्तम दर्जाच्या मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे मात्र साफ दुर्लक्ष केले जात असल्याचे पहावयास मिळत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महापालिकेकडून जनतेला उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शववाहिका होत.
बेळगाव महानगरपालिकेकडून मृतांच्या अंत्यविधीसाठी ज्या शववाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्या बऱ्याच वर्षापासून सातत्याने वापरात असल्यामुळे सध्या त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे बाहेरून या शववाहिका चांगल्या दिसत असल्या तरी प्रत्यक्षात शववाहिकेच्या आतील भागाची पार दुरवस्था झाल्याचे पहावयास मिळते. शववाहिकेच्या मागील दरवाजा आतील बाजूने पूर्णपणे खराब झाला असून मृतदेहासाठी असणाऱ्या स्ट्रेचरची अवस्था देखील तीच आहे. या स्ट्रेचरची फाटून लक्तरे बाहेर पडली आहेत.
एकंदर शववाहिकेची आतील स्थिती इतकी दयनीय आणि बकाल आहे की लोकप्रतिनिधी आणि संबंधित खात्याचे अधिकारी याकडे कसे काय लक्ष देत नाहीत? असा प्रश्न पडतो. तरी लोकप्रतिनिधींनी फक्त नामधारी न राहता याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्मार्ट सिटीला शोभेल अशा चांगल्या दर्जाच्या शववाहिका जनतेला उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.