बेळगाव शहरात आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिव जन्मोत्सव अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संपूर्ण शहर भगवे शिवमय झाले होते. विशेष करून सकाळच्या सत्रात धर्मवीर संभाजी चौकात युवक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांवरून आणलेल्या शिव ज्योतींचे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे स्वागत करण्यात आले.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवरुन आणलेल्या शिवज्योतींचे शहरातील छ. संभाजी चौकात उस्फुर्त स्वागत करण्यात आले. यावेळी छ. शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव आदींचा जयघोष सुरू होता. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी प्रकाश मरगाळे, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, महेश जुवेकर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, रोहन लंगरकांडे, शिवाजी मेणसे, गणेश दड्डीकर आदींनी पुष्पहार अर्पण करून शिवज्योतींचे स्वागत केले.
दरवर्षी शिवजयंतीनिमित्त बेळगावातील युवक मंडळांचे कार्यकर्ते महाराष्ट्रात दौंड काढून तेथील गडकिल्ल्यांवरून शिवजयंती दिवशी बेळगावात शिवज्योत आणतात. त्या ज्योतींचे स्वागत करून शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानुसार आज सोमवारी सकाळी ध. संभाजी चौक येथे शिवज्योतींचे स्वागत करण्यात आल्यानंतर शहापूर येथील शिवाजी उद्यानातील छ. शिवाजी महाराज मूर्ती पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांसह शिवप्रेमींमधील उत्साह ओसंडून वहात होता. सकल मराठा समाज बेळगाव, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ, म. ए. समिती महिला आघाडी, शिवजयंती चित्ररथ मिरवणूक महामंडळ, आमदार ॲड. अनिल बेनके आदींनी शिवाजी उद्यानातील छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी शिवरायांच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला होता.
दरम्यान, शिवजयंती चित्ररथ मिरवणूक महामंडळाच्यावतीने आज सकाळी शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. या कार्यक्रमास बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके, सुनील जाधव, मध्यवर्तीय शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे विकास कलघटगी, सकल मराठा समाजाचे रमाकांत कोंडुसकर, माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवा ज्योतींचे आगमन, मूर्ती अभिषेक, भगवे फेटे, भगवे ध्वज तसेच जयजयकारामुळे आज सकाळी शिवाजी उद्यान शिवमय बनले होते. एकंदर शहरात सर्वत्रच छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आता उद्या मंगळवारी वडगाव येथील चित्ररथ मिरवणूक निघणार असून बुधवारी शहरातील ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक होणार आहे.