अखिल भारतीय पातळीवरील दुसरी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स -2021 मध्ये सुवर्ण पदक हस्तगत करून स्पर्धा गाजविणाऱ्या बेळगावच्या अक्षता कामती हिचे काल बेळगावामध्ये उस्फुर्त स्वागत करून सत्कार करण्यात आला.
बेंगलोर येथे गेल्या महिन्यात अखेर पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील दुसऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स -2021 या स्पर्धेत हलगा (ता. बेळगाव) गावच्या अक्षता बसवंत कामती हिने महिला वेटलिफ्टिंगमध्ये 87 किलो वजनी गटात सर्वाधिक वजन उचलून सुवर्णपदक हस्तगत केले आहे.
यापद्धतीने खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंग मध्ये तिने सलग तीन सुवर्ण पदके पटकावून हॅट्ट्रिक साधली आहे. सदर यश संपादन करून अक्षता कामती हिचे काल मंगळवारी सकाळी रेल्वेने बेळगावात आगमन झाले.
बेळगाव रेल्वे स्थानकावर सुप्रसिद्ध माजी शरीरसौष्ठवपटू ‘मिस्टर इंडिया’ व रेल्वेचे विभागीय मुख्य तिकीट निरीक्षक सुनील आपटेकर यांनी अक्षताचे सहर्ष स्वागत केले. तसेच तिचा मानाची शाल देऊन सत्कार केला.
यावेळी मिठाईचे वाटप देखील करण्यात आले. रेल्वे स्थानकावर झालेल्या या कार्यक्रमास आपटेकर यांच्यासमवेत अक्षताचे वडील बसवंत कामती, कोल्हापूर वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी रामानुजन आणि त्यांचे कुटुंबीय तसेच अक्षताचे हितचिंतक उपस्थित होते.