बेळगाव शहरातील बंटर (नाडवर) संघाचा 38 वा वर्धापन दिन नुकताच न्यू गांधीनगर येथील बंटर भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील बंटर भवन येथे गेल्या रविवारी बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील बंटर (नाडवर) संघाचा वर्धापन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उडुपी जिल्हा हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. तल्लूर शिवराम शेट्टी, कर्नाटक प्रदेश हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष जी. के. शेट्टी, बंटर समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व विठ्ठल हेगडे आणि बेळगाव बंटर संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर शेट्टी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी चंद्रशेखर शेट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ॲड. प्रभाकर शेट्टी यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सोहळ्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह मान्यवरांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी समयोचित विचार व्यक्त करताना बंटर संघाला त्यांच्या समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बंटर संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर शेट्टी यांनी शहरात बंटर समाजाचे लोक अधिक प्रमाणात आहेत. समाजाचा विकास साधण्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बंटर भवनाचे लवकरच नूतनीकरण केले जाणार असून या ठिकाणी सुसज्ज मंगल कार्यालय, पार्किंग, स्टेज, शौचालय आदी सुविधा पुरविल्या जाणार असल्याचे सांगून संघातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. तसेच बंटर संघाचे अध्यक्षपद तब्बल 25 वर्षे सांभाळणाऱ्या विठ्ठल हेगडे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.
याप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण शेट्टी, सचिव चेतन शेट्टी, खजिनदार प्रताप शेट्टी यांच्यासह बंटर समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. प्रारंभी स्वागतगीत स्वाती शेट्टी हिने सादर केले. सूत्रसंचालन शशिधर शेट्टी यांनी तर आभारप्रदर्शन प्रताप शेट्टी यांनी केले. रविवारी सायंकाळी आयोजित या वर्धापन सोहळ्याची सांगता सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहभोजनाने झाली.