बेळगाव शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे आज गुरुवारी सकाळी थरारक अपघात झाला. ज्यामुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. ब्रेक फेल झाल्याने मालवाहू वाहनाने बसला धडक दिली, परंतु सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही.
शहरातील प्रमुख चौक असलेल्या कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आज सकाळी काळजाचा ठोका चुकवणारा विचित्र अपघात घडला.
या ठिकाणी एका मालवाहू वाहनाने ब्रेक फेल झाल्याने समोरील वाहनाला धडक दिली आणि त्या वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बसला धडक दिली. डाव्या बाजूने मधोमध धडक बसल्यामुळे बसचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने बसमधील प्रवाशांना मात्र कोणतीही इजा झाली नाही.
सकाळची वेळ असल्याने चन्नम्मा सर्कल येथे वाहनांची मोठी वर्दळ होती. यावेळी मालवाहू वाहनाच्या चालकाला पोलिसांनी वाहन बाजूला घेण्यास सांगितले. त्यानुसार तो आपले वाहन बाजूला घेत असतानाच ब्रेक फेल झाल्यामुळे मालवाहू वाहनाने समोरील वाहनाला धडक दिली आणि ते वाहन जाऊन बस गाडीला धडकले.
सदर अपघातामुळे चन्नम्मा सर्कल येथील वाहतूक कांही काळ विस्कळीत झाली होती. अखेर पोलिसांनी क्रेन मागून अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली.





