श्री स्पोर्ट्स खडक गल्ली आयोजित ‘श्री चषक -2022’ अखिल भारतीय निमंत्रितांच्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अजिंक्यपदासह 1,55,555 रुपयांचे भव्य पारितोषिक झियान स्पोर्ट्स संघाने हस्तगत केले. अंतिम सामन्यात झियान स्पोर्ट्सने प्रतिस्पर्धी जी. जी. बॉईज संघावर 3 गडी राखून विजय मिळविला.
श्री स्पोर्ट्स, खडक गल्ली आयोजित ‘श्री चषक -2022’ अ. भा. निमंत्रितांच्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची आज बुधवारी सायंकाळी टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर दिमाखदार बक्षीस समारंभाने यशस्वी सांगता झाली.
या स्पर्धेचा अंतिम सामना आज झियान स्पोर्ट्स आणि जी. जी. बॉईज या संघांमध्ये खेळला गेला प्रथम फलंदाजी करताना जी. जी. बॉईज संघाने मर्यादित 8 षटकात 5 गडी बाद 82 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल झियान स्पोर्ट्स संघाने 7 षटकात 7 गडी गमावून विजयासाठी आवश्यक 83 धावा झळकविल्या.
त्यांच्या सुनील चावरी याने तडाखेबंद फलंदाजीचे प्रदर्शन करताना अवघ्या 14 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारांच्या सहाय्याने 35 धावा फटकाविल्या. सुहास पवार (1 चौ., 1ष. नाबाद 12) आणि विश्वजीत (1 चौ., 1 ष. नाबाद 12) यांनी संघाला विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी झियानचा सुनील चावरी हा ठरला.
अंतिम सामन्यानंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या झियान स्पोर्ट्स संघाला आकर्षक चषकासह 1,55,555 रुपयांचे पारितोषिक तसेच उपविजेत्या जी. जी. बॉईज संघाला 77,877 रुपयांचे पारितोषिक व चषक प्रदान करण्यात आला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक विजेते पुढीलप्रमाणे आहेत. उत्कृष्ट फलंदाज : प्रथमेश पवार (झियान स्पोर्ट्स), उत्कृष्ट गोलंदाज : गौरेश नावेकर (जी.जी. बॉईज), इम्पॅक्ट खेळाडू : भूषण घोले (सरकार स्पोर्ट्स), मॅन ऑफ द सिरीज : सूर्या गावकर (जी.जी. बॉईज). सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री स्पोर्ट्स खडक गल्लीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.