श्री स्पोर्ट्स खडक गल्ली आयोजित भव्य बक्षीस रकमेच्या ‘श्री चषक -2022’ अ. भा. निमंत्रितांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील आज शुक्रवारी झालेल्या सामन्यांमध्ये साईराज स्पोर्ट्स, सरकार स्पोर्ट्स गांधिनगर आणि डिंग डॉंग स्पोर्ट्स या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय संपादन केले.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आज सकाळी पहिल्या सामन्यात साईराज स्पोर्ट्स संघाने प्रतिस्पर्धी सदा स्पोर्ट्स संघाचा 9 गडी राखून दारुण पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सदा स्पोर्ट्स संघाने मर्यादित 8 षटकात 6 बाद 56 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल साईराज संघाने 3.5 षटकात 1 गडी बाद 57 धावा झळकविल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी साईराजचा रब्बानी दफेदार ठरला. त्याला प्रमुख पाहुणे आनंद चव्हाण व मनोज ताशिलदार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघाने देखील प्रतिस्पर्धी एसजी स्पोर्टस संघावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एसजी स्पोर्ट्स संघाने मर्यादित 8 षटकात 4 गडी बाद 55 धावा काढल्या. हे आव्हान यशस्वीरित्या झेलताना सरकार स्पोर्ट्स संघाने 3.1 षटकात 1 बाद 58 धावा काढल्या. सरकार स्पोर्ट्सचा सागर अवने ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरला त्याला. प्रमुख पाहुणे मंजुनाथ निंगण्णावर आणि भूषण तम्मानाचे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
तिसऱ्या सामन्यात अल रझा संघाने प्रतिस्पर्धी युवा स्पोर्ट्स संघावर 5 गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना युवा स्पोर्ट्स संघाने मर्यादित 8 षटकांत 7 बाद 87 धावा काढल्या. प्रत्युतरादाखल अल रझा संघाने 8 षटकात 5 गडी बाद 88 धावा काढून सामना जिंकला. या सामन्यातील सामनावीर पुरस्कार अल रझाच्या मोशीम सनदी याला प्रमुख पाहुणे समीर येळ्ळूरकर आणि ओमकार आजगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
चौथ्या सामन्यात हिंदू स्वराज्य संघाला प्रतिस्पर्धी डिंग डॉंग स्पोर्ट्स संघाकडून 7 गड्यांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना हिंदू स्वराज्य संघाने 7.1 षटकात सर्वगडी बाद 32 धावा काढल्या. डिंग डॉंग संघाने 4 षटकात 3 गडी बाद 35 धावा काढून सामना जिंकला. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कार डिंग डाँगच्या विनोद तवळे याला प्रमुख पाहुणे निखिलअण्णा घाडगे व शिवकुमार पद्मन्नावर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आजच्या शेवटच्या पाचव्या सामन्यात सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघाने प्रतिस्पर्धी अल रझा संघाला 6 गडी राखून पराजित केले. प्रथम फलंदाजी करताना अल रझा संघाने मर्यादित 8 षटकात 3 बाद 65 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल सरकार स्पोर्ट्सने 5.3 षटकात 4 गडी बाद 69 धावा झळकावल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी सरकार स्पोर्ट्सचा अंकित बुचडी हा ठरला. त्याला प्रमुख पाहुणे शीतल पाटील व कोमल पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
आता उद्या शनिवार दि. 2 एप्रिल रोजी होणारे सामने पुढील प्रमाणे आहेत. सकाळी 8:30 वा. -अक्षत स्पोर्ट्स विरुद्ध मोहन मोरे इलेव्हन, सकाळी 10:30 वा. -शितल रामशेट्टी इलेव्हन विरुद्ध नियती फाउंडेशन (सरनोबत), दुपारी 1:30 वा. -डिंग डाँग स्पोर्ट्स विरुद्ध साईराज स्पोर्ट्स, दुपारी 3:30 वा -पहिल्या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ.