बेळगावची यंदाची शतकपूर्ती शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस खात्याकडून बंदोबस्ताचे नियोजन केले जात असून यावेळी चित्ररथ मिरवणुकीवर ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवली जाणार आहे. या पद्धतीने मिरवणुकीतील प्रत्येक घडामोडीवर पोलीस खात्याची बारीक नजर असणार आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून शिवजयंती मिरवणुकीची परंपरा खंडित झाली होती. तथापि कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यंदाच्या चित्ररथ मिरवणुकीमध्ये 70 हून अधिक मंडळांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत.
दरम्यान, शिवजयंती दिवशी बसव जयंती मिरवणूक तसेच मुस्लिम बांधवांचा रमजान सण असल्यामुळे पोलीस खात्याकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. कोठेही शांतता भंग होऊ नये, या दृष्टिकोनातून पोलिस अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत.
यंदाची शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पारंपारिक मार्गावरून निघणार आहे. मिरवणूक काळात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्याबरोबरच विशेष म्हणजे संपूर्ण चित्ररथ मिरवणुकीवर ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवली जाणार आहे.
कायदा हातात घेणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. तेंव्हा सर्वांनी शांततेत मिरवणूक पार पाडून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी केले आहे.