आगामी श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी आज शुक्रवारी दुपारी श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मिरवणूक मार्गाची पाहणी केली.
बेळगाव शिवजयंतीची चित्ररथ मिरवणूक येत्या 4 मे रोजी काढण्यात येणार आहे. सदर मिरवणूक कोणताही अडथळा न येता सुरळीत पार पडावी या दृष्टिकोनातून पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी सहकारी पोलीस अधिकारी व शिवजयंती चित्ररथ मिरवणूक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह आज दुपारी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. सदर पाहणी दौऱ्याला कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथून प्रारंभ झाला. चन्नम्मा सर्कल येथून काकतीवेस रोड, शनिवार खूट, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली मार्गे ध. संभाजी चौकापर्यंतच्या मार्गाची पोलीस उपायुक्तांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सोबतचे अधिकारी आणि महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती जाणून घेतली.
यावेळी बेळगाव लाइव्हशी बोलताना पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी बेळगावची शिवजयंती मिरवणूक ही अतिशय भव्य प्रमाणात होते हे लक्षात घेऊन त्या दृष्टिकोनातून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला जाईल. मिरवणूक मार्गाच्या पाहणी दौऱ्यानंतर कशाप्रकारे बंदोबस्त तैनात करावयाचा याबाबत योजना आखली जाईल. संवेदनशील भागात कडक पोलीस बंदोबस्त असेल असे सांगून मिरवणुकी दरम्यान डॉल्बीचा वापर करावयास द्यायचा की नाही याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही पोलीस उपायुक्त गडादी यांनी स्पष्ट केले.
सदर पाहणी दौऱ्याअंती येत्या 4 मे रोजी काढण्यात येणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या मार्गावर विशेष करून संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना करण्याबरोबरच सरदार हायस्कूल समोर, चांदु गल्ली काॅर्नर, खंजर गल्ली मोनाप्पा पान शॉप आदी ठिकाणी बॅरिकेड्स घालण्याची सूचना केली.
चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी सूचनांची नोंद घेऊन पोलीस उपायुक्त गडादी यांनी आपल्या सरकारी अधिकाऱ्यांना त्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास सांगितले. पाहणी दौऱ्याप्रसंगी पोलीस उपायुक्तांसमवेत मार्केटचे एसीपी सदाशिवराव कट्टीमणी, खडेबाजारचे एसीपी चंद्रप्पा, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, मार्केटचे पोलीस निरीक्षक तुळशीदास यांच्यासह शिवजयंती चित्ररथ मिरवणूक महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, मेघन लंगरकांडे, राहुल जाधव, प्रसाद मोरे आदी उपस्थित होते.