साहित्यातला कुठलाही लेखन प्रकार वापरा पण तो समाजाची नवनिर्मिती करण्यासाठी फेरमांडणी करण्यासाठीच आहे हे भान ठेवून आपले लेखकपण निभवा असे आवाहन आजरा येथील ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांनी केले.रविवारी बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन मध्ये पहिल्या प्रगतशील लेखक साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान निभावताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संमेलन उदघाटक ऍड. राजाभाऊ पाटील, कॉम्रेड भालचंद्र कांगो, प्रा. आनंद मेणसे, कृष्णा शहापूरकर, ऍड. नागेश सातेरी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरगुप्पे पुढे म्हणाले की लेखक म्हणून कमावलेले शब्दसामर्थ्य हे केवळ मनोविनोद देण्यासाठी नाही तर शब्द हे हत्यार आहे. वाईटाच्या विध्वंसासाठी ते शस्त्र म्हणून वापरायचे असते सुंदरतेच्या उभारण्यासाठी ते उपकरण म्हणून हाताळायचे असते. लेखकांच्या जीवित कार्याचे भान देण्यासाठीच प्रेमचंद आणि प्रगतिशील लेखक संघाची निर्मिती केली.1936 साली या जीवन निष्ठ समाजवादी विचारांच्या लेखकांच्या भूमीकेचेचल रणशिंग फुंकण्यासाठी प्रगतिशील लेखक संघाचे पहिले संमेलन भरवले आणि तिथून समाज बदलासाठी सजलेल्या या लेखक कार्यकर्त्यांचे संपूर्ण भारतभर त्या त्या राज्यातील भाषांमधून अभिवादन सुरू झाले आणि ते आजतागायत सुरू आहे असे म्हटले.
लेखक म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे आणि ऐतिहासिक स्वरूपाचे झाली आहे लेखक ही मिरवण्याची गोष्ट पुर्वी नव्हती आताही नाही. लेखक हा सदैव लढायला सज्ज असलेला आणि अंतिम त्यागाला तत्पर असलेला सैनिक असतो. गेल्या दोन वर्षात खलनायकी प्रवृत्ती, संपूर्ण जग अधोगतीला कसे नेतात हे आपण अनुभवत आहोत आणि हे जग वाचवण्याची सुरक्षित ठेवण्यासाठी अंतिम निर्णायक लढाई लेखक म्हणून आपलीच आहे हे या वेळी आपण स्वतःशी पूर्णपणे बिंबवून घेतले पाहिजे. संपूर्ण जगाचा इतिहास पाहिला तेव्हा हेच दिसते की जग जेव्हा जेव्हा संकटात सापडते तेव्हा तेव्हा लेखकानी सावरण्यासाठी निर्णायक काम केले आहे असे ते म्हणाले.
साहित्य संमेलनाची सुरुवात मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.पहिल्या सत्रात श्रद्धांजली ठराव मांडण्यात आला. यानंतर मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांच्यावतीने प्रार्थना सादर करण्यात आली. प्रगतशील लेखक संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. तर राजाभाऊ शिरगुप्पे, राजाभाऊ पाटील आणि नागेश सातेरी यांच्याहस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोशनी हुंदरे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले तर ऍड. राजाभाऊ पाटील यांनी उद्घाटनपर भाषण केले. या संमेलनाच्या निमित्ताने ‘ब्राह्मणी मानसिकता आणि पु ल देशपांडे या संजय मेणसे लिखित आणि कॉ. कृष्णा मेणसे यांचे चरित्र हे सुभाष धुमे लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी उदघाटन पर भाषणात राजाभाऊ पाटील बोलताना म्हणाले, कार्यकर्ते तयार कारण हि अधिक महत्वाचे आहे. कार्यकर्ते तयार झाल्याशिवाय साहित्य चळवळी यशस्वी होऊ शकत नाहीत. या संबंध चळवळीमध्ये डावा आणि उजवा असे दोन भाग असून डाव्या विचारसरणीत समतेचा, सक्षमतेचा, आर्थिक समानतेचा विचार आहे. हे विचार घेऊन समानतेने पुढे जाणे आणि केवळ आर्थिक सुबत्तेवर संघर्ष करणे या गोष्टी समाजाच्या शोषणावर टिकून आहेत. या दोन विचारांच्या संघर्षात नेहमीच कष्टकऱ्यांच्या विजय होत आला आहे, असे ते म्हणाले.