Saturday, September 7, 2024

/

उपनयन सोहळा एका वृद्धाश्रमात

 belgaum

आज-काल कुटुंब व्यवस्थाच बदलत चालली आहे. नवरा बायको आणि आपली मुले इतकेच कुटुंब हवे आहे. घरातील वडीलधाऱ्या मंडळींबद्दल आदर मानसन्मान नाहीच त्यांना कुठेतरी बाहेर ठेवून प्रायव्हसी चे जीवन जगण्याची मानसिकता निर्माण होत आहे. नेमके हेच टाळण्यासाठी लहान वयातच योग्य संस्कार झाले तर पुढील काळात फक्त घरातील वडीलधाऱ्यांचा नव्हे तर संपूर्ण समाजाचा मान राखला जाईल या उदात्त हेतूने उपनयन सोहळा एका वृद्धाश्रमात आयोजित करण्याचा निर्णय बेळगावच्या एका कुटुंबाने घेतला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चि. पृथ्वीराज हा बेळगाव येथील ब्युटिशियन सौ. प्रतीक्षा आणि मुक्त पत्रकार  प्रसाद प्रभू यांचा चिरंजीव.त्याच्या उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा सोहळा बेळगाव येथील शांताई वृद्धाश्रमात होणार आहे. या सोहळ्याचे सारे नियोजन पृथ्वीराज च्या आजी आणि निवृत्त सरकारी अधिकारी सुनिता प्रभू यांनी केले आहे.
उपनयन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी तेरावा संस्कार आहे.

ज्या गृह्यसूत्रोक्त कर्माने बाळाला वेदाध्ययनासाठी गुरूजवळ नेले जाते त्याला “उपनयन” असे म्हणतात. कालांतराने अध्ययनाच्या पद्धती बदलल्या. शाळा आल्याने आता शिक्षणासाठी आश्रमात जाणे थांबले… संस्कार तर दिलेच पाहिजेत म्हणूनच हा सोहळा आम्ही आयोजित केलाय बेळगावातील सामाजिक कार्याचा एक मानदंड असलेल्या शांताई आश्रमाच्या सानिध्यात. आई,वडील,आजी,आजोबा, गुरू,नातेवाईक,शेजारी आणि समाजातील सर्वच घटकांशी आदर,प्रेम,श्रद्धा,निष्ठा आणि नम्रतेने वागण्याची शिकवण अर्थात संस्कार देण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले.

Shantai logo
असा होईल सोहळा
मुख्य उपनयन सोहळा शुक्रवार दिनांक ६ रोजी बामणवाडी रोड येथील शांताई आश्रम (दुसरे बालपण) येथे होणार आहे. कार्यालय आणि इतर साऱ्या अफाट खर्चाना फाटा देऊन आम्ही आश्रमातील आज्जी आजोबासमवेत हा सोहळा साजरा करीत आहोत.अनाथ, अंध आणि असहाय्य अशा मुलांनाही या सोहळ्यात विशेष आमंत्रण दिले जाणार आहे. आमच्या मुलाला लहान वयातच सामाजिक भान यावे हा उद्देश आहे असे मुलाचे वडील मुक्त पत्रकार प्रसाद प्रभू यांनी सांगितले.
जेथे समाजकार्याचा उत्तम आदर्श घेता येईल अशा ठिकाणी हा सोहळा आयोजित करण्याचा उद्देश आम्ही ठेवला, याला शांताईचे अध्यक्ष विजय पाटील आणि कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी अनुमती दिली याबद्दल त्यांचे ऋणी आहोत.

हा आश्रम निराधार ४० वृद्धांची मागील २५ वर्षापासून विनामूल्य देखभाल करत आहे. गरजू विद्यार्थ्यांना रद्दी संकलित करून शिक्षणास मदत करीत आहे. यामुळे येथे मुलाची मुंज झाली तर या सोहळ्या मागचा खरा उद्देश साध्य होऊ शकेल असे या कुटुंबाने सांगितले.

आश्रमात राहणाऱ्या आजी – आजोबांना घरगुती वातावरण मिळावे. त्यांच्याकडे ही बाहेरून नातवंडे यावीत म्हणून आम्ही वाढदिवसा सारखे कार्यक्रम येथे करण्याची विनंती अनेकांना करत असतो. अनेक जण येथे येऊन असे सोहळे साजरे करतात. मात्र मुंजी सारखा मोठा कार्यक्रम आश्रमात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापुढील काळात असे कार्यक्रम करून आदर्श निर्माण करण्याची आमची तयारी आहे. यामुळे को मुंज असो किंवा लग्न कमी खर्चात आणि आजी-आजोबांच्या सान्निध्यात करायचे असल्यास त्यांनी बेळगावच्या शांताईला आपले मानावे. असे आश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी यानिमित्ताने सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.